

The DPR for Latur's 60 km four-lane outer ring road will be ready soon
लातूर पुढारी वृत्तसेवा: लातूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ६० किलोमीटर लांबीच्या चारपदरी (फोरलेन) आऊटर रिंगरोडला आता मोठी गती मिळाली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ एजन्सीकडून निविदा मागवल्या आहेत. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.
लातूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, जड वाहने, शहरांतर्गत दळणवळणावरील ताण आणि अपघातांची संख्या लक्षात घेता औटर रिंगरोडची गरज अनेक वर्षांपासून नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. हा औटर रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर शहरात न शिरता बाह्य मागनि वाहतूक होणार असून, त्यामुळे लातूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
हा औटर रिंगरोड चार पदरी असणार असून सुमारे ६० किलोमीटर लांबीचा असेल. यामुळे लातूर जिल्ह्यातील औद्योगिक, व्यापारी तसेच शैक्षणिक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. शेतकरी, व्यापारी, वाहनचालक तसेच सर्वसामान्य नागरिकांना या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आभार मानले आहेत. लातूर औटर रिंगरोड प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाल्यानंतर लातूर शहर व जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, नागरिकांमध्ये या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
या संदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, लातूर औटर रिंगरोड हा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. डीपीआरसाठी निविदा प्रक्रिया सुरू होणे म्हणजे प्रत्यक्ष कामाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे.