

किंनगाव : पुढारी वृत्तसेवा
परभणी जिल्ह्यातील अंदाजे ६० ते ७० जणांना घेऊन जाणारा टेम्पो शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोपरा गावाजवळील धानोरा पाटीजवळ पलटी झाला. या अपघातात प्रवाशी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथे ओलीमा (रिसेप्शन) कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्यातील नागरिक टेम्पो करून आले होते. कार्यक्रम करून पुन्हा परभणीकडे जात असताना कोपरा गावाजवळील धानोरा पाटी कॉर्नरजवळ त्यांच्या टेम्पोचा अपघात झाला. त्यामुळे टेम्पोखाली अडकून ३० ते ४० जण गंभीर जखमी झाले. काही जणांची प्रकारती रात्री चिंताजनक होती.
या अपघातात काहींच्या हाताला गंभीर जखम झाली, तर काही जणांच्या डोक्याला, पायाला मार लागल्याने रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत होता. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. काही जणांना गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. यात महिला, नागरिक, लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे.
काहींना अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात तर काहींना किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर आणि अंबाजोगाई तर काही जणांना इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे. या अपघातात आतापर्यंत एक जण ठार झाले असून, काही लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.