

जळकोट: ढगफुटीमुळे जळकोट तालुक्यावर पडलेला पुराचा वेढा अद्याप कायम असून सबंध तालुका जलमय झाला आहे. जिल्हा मार्ग, प्रमुख मार्ग, राज्यमार्ग अशा सर्वच मार्गांवरील पूल पाण्याखाली बुडाले असल्याने एकाही गावातील नागरिकांना बाहेरुन गावात येता येत नाही अन गावातून बाहेरगावी जाता येत नाही.
जिल्हा मार्ग असो की राज्यमार्ग सध्या सर्वच मार्ग हे जलमार्ग बनले आहेत. ज्यावरून वाहतूक सुरु होती असा जळकोट - बिदर राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव मार्ग शिल्लक होता. तथापि, तिरुका (ता जळकोट) येथील तिरु नदीच्या जुन्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आता हा राष्ट्रीय महामार्गही प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे.
ढगफुटीसदृश्य पावसाने जळकोट तालुक्यात हाहाकार माजवला आहे. तिरु नदीला आलेल्या पुरामुळे या नदीकाठी असलेल्या बेळसांगवी (ता. जळकोट) या गावास असलेला धोका लक्षात घेऊन येथील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने लाळी (बु.) येथे हलविण्यात आले आहे. मंगरुळ ( ता. जळकोट) येथील अनेक जणांच्या घरात पाणी शिरले आहे.
तिरु नदीच्या काठावरील बेळसांगवी, तिरुका, मरसांगवी, डोंगरगाव, सुल्लाळी, अतनूर, गव्हाण या गांवाना पुराचा मोठा फटका बसला आहे. शेतजमीन, उभी पिके वाहून गेली आहेत. या गावांसह अनेक गावांतील घरांत पाणी शिरुन संसारांचे वाटोळे झाले आहे. काल उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी बेळसांगवी येथे भेट पूर परिस्थितीचा आढावा घेतला व नागरिकांना दक्षतेबाबत योग्य त्या सूचना दिल्या.
सर्व रस्त्यांनी जलमार्गाचे स्वरुप धारण केल्याने तालुक्यातील सर्वच गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. नांदेड - जळकोट - उदगीर - बिदर हा राष्ट्रीय महामार्ग दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतरही वाहतुकीसाठी वापरात होता. हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही कल्पना खरी करुन दाखवली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी जळकोट तालुक्याचा पिच्छा सोडायला तयार नाही. सतत धो धो पडणा-या पावसामुळे कोणालाही घराबाहेर पडता येत नाही. सध्या रस्ते निर्मनुष्य, बाजारपेठा ठप्प आणि घरे जलमय झाली आहेत. नदी वाहत जावी त्याप्रमाणे शेता शेतांतून पाणी वाहत जात आहे. वाहून गेलेली जमीन आणि पिके पाहून शेतकऱ्यांचे डोळे डबडबले आहेत. मरसांगवी, अतनूर, कोळनूर, विराळ आदी गावांमध्ये अनेक घरांत पाणी शिरले असून काही घरे कोसळली आहेत. ढोरसांगवी, वडगाव या गावांसह तालुक्यातील प्रत्येक गावांच्या शिवारातील हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली आहेत. शेतीच्या नुकसानीचा अंदाज लावणे आवाक्याबाहेर गेले आहे. रस्ते सुध्दा खरडून गेले आहेत त्यामुळे त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या जळकोट तालुक्यातील जवळपास सर्व गावांचा दौरा करुन पूर परिस्थितीचा, नुकसानीचा आढावा घेण्याची तत्परता जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे हे दाखवत आहेत. आवश्यक ठिकाणी जाऊन ते माहिती घेत आहेत. आज तिरु नदीच्या काठावर असलेल्या मरसागवी, अतनूर आदी गावांत जाऊन पाणी शिरलेल्या, पडझड झालेल्या घरांची त्यांनी स्वतः पाहणी केली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास सोमुसे पाटील, अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, मरसांगवीच्या सरपंच पूजा रवी गोरखे, तलाठी अतीक शेख आदींसह अनेकजण त्यांच्या समवेत होते. आपत्तीग्रस्त कुटुंबे व ज्यांना आता जगण्याचे साधनच उरले नाही अशा जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तीन - चार वर्षांपूर्वी जळकोट - बिदर हा राष्ट्रीय महामार्ग काही अपवाद वगळता पूर्ण झाला आहे. केवळ तिरु नदीवरील ( तिरुका ता. जळकोट) येथील पूल बांधकाम बाकी होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तत्परता दाखविली असती तर हा पूल केव्हाच पूर्ण होऊन मार्गावरील प्रवास सुरक्षित झाला असता. पण चार वर्षे काम रेंगाळत ठेवून ऐन या पावसाळ्यात पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि नियोजनशून्यतेमुळे या राष्ट्रीय महामार्गाची शोभा झाली असून तो बारमाही वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही. जुन्या पुलावरुन पाणी जात असल्याने कोट्यवधी रुपयांचा हा महामार्ग आता कुचकामी ठरला आहे.