

तुळजापूर (लातूर) : तुळजाभवानीच्या १४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर कालावधीत होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी अंदाजे ५० लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. सुरक्षित, सुरळीतपणे हा उत्सव पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला मंगळवार (दि.16) केल्या.
महोत्सव कालावधीत राज्य परिवहन महामंडळाकडून जादा प्रवासी वाहतुकीसाठी नवीन ५० बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी यावेळी सांगितले. तुळजापूर येथील श्री तुळजापूर देवी मंदिर संस्थानच्या सभागृहात पालकमंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली शारदीय नवरात्र महोत्सव तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमराजे कदम, विपिन शिंदे, अनंत कोंडो यांच्यासह सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते उत्सव काळात विद्युत कंपनीकडून २४ तास अखंडित वीजपुरवठा राहील यासाठी कार्यवाही करावी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे तत्काळ करण्यात यावीत, मराठी, कन्नड आणि तेलगू भाषेत
दिशादर्शक फलक बसवावेत. नगर परिषदेकडून स्वच्छता, पार्किंगची सुयोग्य व्यवस्था करण्यात यावी. चार ते पाच ठिकाणी हिरकणी कक्षाची निर्मिती करावी, आदी सूचनाही पालकमंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दृष्टीने सोपवलेल्या जबाबदाऱ्या, त्याच्या प्रगतीबाबतची माहिती यावेळी दिली.