

रेणापूर : श्री रेणुका देवीच्या पालखी मिरवणुकीने व “आई राजा उदे उदे , सदानंदीचा उदे उदे” अशा जयघोषात आणि हलगी - झांजाच्या कडकडाटात गुरुवारी रेणापुरात चैत्र पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री रेणुकादेवी ट्रस्ट मंदिराच्या वतीने देवीला अभिषेक करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाआरतीने देवीची पूजा करण्यात आली. दिवसभर हजारो भाविक भक्तांनी देवीचे दर्शन घेतले.
रेणापूरचे आराध्यदैवत श्री रेणुकादेवी हे पंचक्रोशीत एक भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून परिचीत आहे. दरवर्षी दसरा व चैत्र पौर्णिमेला देवीच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत आराधी महिला व पुरुष भाविकांची मोठी गर्दी असते. नवरात्र उत्सवात व चैत्र पौर्णिमेला अनेक मान्यवरांच्या हस्ते देवीला अभिषेक करून महापूजा केली जाते. गुरुवारी रात्री साडेआठ वाजता देवीची पालखी मंदिरातून निघाली .
मध्यरात्रीपर्यंत पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोबत आराधी मंडळी महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावात ठिकठिकाणी भाविक भक्तांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. ट्रस्टचे अध्यक्ष राम पाटील, रमाकांत वाघमारे, पंडित माने, ॲड. प्रशांत आकनगीरे, दिलीप आकुनगीरे, पुंडलिक इगे, मनोहर व्यवहारे, राजकुमार पुनपाळे, शहाजी कातळे, सुभाष हाके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दरवर्षी चैत्र पौर्णिमेला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय पशु प्रदर्शन व जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम घेतला जात असे. परंतु मागील काही वर्षांपासून हे कार्यक्रम घेतले जात नाहीत. बहुधा हे कार्यक्रम आता कालबाह्य होत आहेत. रेणापूर येथे पूर्वी जनावरांचा मोठा बाजार भरत होता. बाजारात खरेदी - विक्री झालेल्या जनावरांच्या दाखल्यातून श्री रेणुकादेवी ट्रस्ट मंदिराला उत्पन्न मिळत असे त्यातून कुस्त्या व्हायच्या, दूरदूरवरून पैलवान कुस्त्या खेळण्यासाठी येत असत.
शिवाय पशुप्रदर्शनात पंचक्रोशीतून जनावरे येत होती. चांगल्या पशुंना बक्षिसे दिली जात होती. त्यामुळे चांगले पशु पाळण्याची पशुपालकांमध्ये स्पर्धा असायची. मात्र आता हे चित्र पार बदलून गेले आहे. परत पूर्वीसारखेच कार्यक्रम घेतले जावेत अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे . यासाठी नगरपंचायत व ट्रस्ट मंडळाने विशेष पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच गुरुवारी रेणापूर व परिसरात ठिकठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविक - भक्तांनी मनोभावे हनुमानाचे दर्शन घेऊन मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात आली.