

Protest if aid is not provided before Diwali: Raju Shetty
लातूर, पुढारी वृत्तसेवा
अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे दिवाळीपूर्वी मदत द्यावी अन्यथा राज्यकर्त्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती फारसे गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला. लातूर जिल्ह्यातील पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने बाधित शेतकरी बांधवांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी खा. राजू शेट्टी शनिवारी लातूर दौऱ्यावर आले होते. रविवारी सकाळी रेणापूर तालुक्यातील डिघोळ (देशमुख) येथील नुकसानीची पाहणी करून परतल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी सुसंवाद साधला. चार दिवसापासून आपण लातूर धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहोत.
शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांची जमीन खरडून निघालीय. त्यामुळे निसर्गाच्या रौद्ररूपामुळे झालेले नुकसान पाहून शासनाने अन्य योजना बाजूला सारून शेतकऱ्यांना दि. २९ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ मदत दिली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. २०१९ च्या शासन निर्णयात तिप्पटीने नुकसान भरपाई देण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार जाधव, लातूर पश्चिम जिल्हाध्यक्ष धर्मराज पाटील, पूर्व जिल्हाध्यक्ष माणिक गायकवाड, लातूर महिला जिल्हाध्यक्षा उषाताई झिंगे, जिल्हा उपाध्यक्ष महारुद्र चौंडे, तालुका अध्यक्ष बालाजी शिंदे, स्वराज्य पक्षाचे जिल्हा सरचिटणीस समाधान शिंदे, सल्लागार गणेश शिंदे, विठ्ठल माने, प्रकाश सोनपेठकर, उमाकांत मोरे आदी उपस्थित होते.