

चाकूर: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री आणि लातूरचे सुपुत्र विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद आता संपूर्ण जिल्ह्यात उमटू लागले आहेत. या विधानाचा निषेध करण्यासाठी चाकूर शहर काँग्रेसच्या वतीने आज (दि.९ जानेवारी) जुन्या बसस्थानकासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
काँग्रेस शहराध्यक्ष पप्पूभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र येत रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. लातूरच्या अस्मितेचा अवमान केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या प्रतिमेचे दहन केले. "विलासरावजी देशमुख यांच्याबद्दल चुकीचे विधान खपवून घेतले जाणार नाही," असा इशारा यावेळी शहर काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने निलेश देशमुख, वैभव धोंडगे,रोहित धनेश्वर, अकबर पटेल, परमेश्वर गायकवाड, गौसपाशा शेख, अझर सौदागर, नबी कुरेशी, मारोती वाघमारे, तौसिफ शेख, बालाजी व्होटे, रफिक सौदागर, विश्वनाथ मोठेराव आणि इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.