लातूर - शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर आहे, आपले जे काही राज्य स्तरावरील प्रश्न असतील अडचणी असतील त्या प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी पाठपुरावा करेन, शिक्षण क्षेत्रात देखील औसा पॅटर्न आता निर्माण होत आहे. यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून तालुका वेगळ्या उंचीवर जाण्यासाठी मीही प्रयत्न करत आहे. याचसोबत सर्व शिक्षक बांधवांनीही प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.
शाळा न्यारी शाळा अभियानांतर्गत जवळपास २ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. याचबरोबर प्रत्येक शाळेला ३२ लाख रुपयांचा टेंब स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष तरतूद करून टॅब साठी निधी उपलब्ध करून दिला. या पाच वर्षांत शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या संघटनेचे लोक वेगवेगळे प्रश्न घेऊन माझ्याकडे आले होते. ते प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हास्तरावरून राज्य स्तरावर पाठपुरावा केला असून यातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. यापुढेही राज्य स्तरावरील काही अडचणी असतील तर त्या प्रामुख्याने संबंधित मंत्री व विधीमंडळाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्न करेन असे ते म्हणाले यावेळी औसा तालुक्यातील १४ केंद्रांमधील प्रत्येक केंद्रातून एक याप्रमाणे १४ शिक्षकांना तालुकास्तरावर औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी गोविंद राठोड, गट समनव्यक रमाकांत जाधव, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट साधन केंद्रातील सर्वसाधन व्यक्ती, विशेष शिक्षक, तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात औसा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी गोविंद राठोड यांनी गेल्या वर्षभरात शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली. तसेच आमदार अभिमन्यू पवार आमदार निधीतून प्रत्येक शाळेसाठी टॅब उपलब्ध करून दिल्याबद्दल तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त केले. सरपंच संघटनेचे अध्यक्ष विष्णू महाराज कोळी उपस्थित होते.