

Orders have been issued regarding student safety in school buses
जळकोट, पुढारी वृत्तसेवा शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अधिक सुरक्षित, जोखीमविरहित व शिस्तबद्ध व्हावी, यासाठी जिल्हा शिक्षण विभागाने स्कूल बस सुरक्षेबाबत कठोर आदेश निर्गमित केले आहेत., हे आदेश जळकोट तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात यावेत, अशी मागणी पालकांनी संबधीत यंत्रणांना केली आहे.
शासन निर्देशानुसार जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली दि. ४ सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. प्रत्येक स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व जीपीएस यंत्रणा बसविणे बंधनकारक करण्यात SCHOOL BUS आले असून, महिला अटेंडंट नेमणे आवश्यक असल्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच बस चालक, कंडक्टर व क्लीनर यांची पोलीस पडताळणी करणे अनिवार्य आहे. सर्व स्कूल बसेस परवानाधारक असाव्यात व त्यासाठी जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांची अधिकृत मंजुरी आवश्यक राहील. परवानगीशिवाय विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच १०० टक्के स्कूल बस तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे.
प्रत्येक स्कूल बसमध्ये स्पीड गव्हर्नर बसविणे आवश्यक असून त्याचीही शंभर टक्के तपासणी होणार आहे. वाहनांची योग्यता प्रमाणपत्रे, विमा, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र यांची तपासणी परिवहन समितीकडून केली जाणार आहे. मनुष्यबळाची कमतरता भासल्यास परिवहन विभाग पोलिस प्रशासनाची मदत घेणार आहे. अवैध वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय, विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेत कार्यक्रम राबविण्याचे निर्देश गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. या सर्व बाबींबाबत शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, लातूर यांनी दि. १० डिसेंबर रोजी स्पष्ट आदेश दिले आहेत. या नियमांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांच्या जीवितास कोणताही धोका राहणार नाही. त्यामुळे जळकोट तालुक्यात तालुका शिक्षण विभाग व संबंधित यंत्रणांनी तातडीने पुढाकार घेऊन आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.