

Online transfers Zilla Parishad teachers Latur district
औसा, पुढारी वृत्तसेवा लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या २०२४-२५ संच मान्यतेनुसार झाल्यास ३५० शिक्षकांना ऑफलाइन बदल्यास सामोरे जावे लागेल तर १०३ शिक्षकांना जिल्ह्यात एकही रिक्त जागा राहणार नसल्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या २०२३-२४ च्या संचमान्यतेवरच करण्यात याव्यात अशी मागणी औसा शिक्षक संघाचे अध्यक्ष महादेव खिचडे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्याचे वारे सुरू आहे. संचमान्यता शालेय शिक्षण विभाग करणार असून शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या ग्रामविकास विभाग करणार आहे. या दोन विभागांचा समन्वय नसल्यामुळे पटसंख्या असून ही पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचे शिक्षक अतिरिक्त होऊन जिल्हा बाहेर जाणार आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया गेल्या दोन महिन्यापासून चालू होती, त्यामध्ये २०२३-२४ संच मान्यतेनुसार ऑनलाइन पोर्टलवर प्रत्येक शाळेची संख्या भरण्यात आली होती.
२०२३-२४ संचमान्यतेनुसार लातूर जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकाला ऑफलाइन बदलीला सामोरे जाण्याची किंवा अतिरिक्त होण्याची वेळ येणार नाही. परंतु अचानक ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी व्हीसी घेऊन त्यामध्ये सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना यावर्षीच्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या सन २०२४-२५ संच मान्यतेनुसार करण्यात याव्यात अशा सूचना दिल्या.
त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा अंतर्गत बदलीसाठी ३० सप्टेंबर २०२४ रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या सन २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त पदे नोंदवण्यात यावेत असे लेखी पत्र काढले आहे. असे जर झाले तर लातूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदा शिक्षकांना जिल्ह्याबाहेर बदलून जावे लागेल, शाळेतील विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड व्हॅलीड संख्येनुसार ग्राह्य धरून संच मान्यता झाली असल्यामुळे पदवीधर, मुख्याध्यापक आणि शिक्षक ही पदे १५ मार्च २०२४ जीआर नुसार खूप प्रमाणात कमी झाली आहेत.
सन २०२४-२५ संच मान्यतेनुसार ऑनलाइन बदल्या झाल्यास व लातूर जिल्ह्यात बदलीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यास ३५० शिक्षकांना ऑनलाइन बदलीने जागा मिळणार नाही. लातूर जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधर, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या रिक्त जागेवर देऊन सुद्धा सरा-सरी १०३ शिक्षक लातूर जिल्ह्यात अतिरिक्त होत आहेत.
याबाबत न्यायालयात रीट याचिका दाखल असून यामध्ये समायोजन म्हणजेच बदल्या आहेत अशी शासनाची भूमिका असून याने न्यायालयाचा अवमान ही होणार आहे असे असूनही शासनाचा २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसारच बदल्या करण्याचा आग्रह आहे, असल्याचे खिचडे यांनी निवेदनात म्हटले आहे.