

निलंगा: निलंगा येथील शिवाजी शिक्षण प्रसारक संस्था अंतर्गत चालवण्यात येत असलेल्या शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला कनिष्ठ लिपिक पदासाठी माझ्या नावाचा प्रस्ताव का पाठवला नाही म्हणून मारहाण करण्यात आली. तसेच चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याचा प्रयत्न करत कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून महत्त्वाची कागदपत्र फाडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला . ही घटना शनिवारी २२ रोजी घडली. विद्यालयाच्या समोरच पोलीस ठाणे असल्यामुळे मुख्याध्यापिकेने धावतच पोलीस स्टेशन गाठले आपला जीव वाचवला.
याबाबतची माहिती अशी की, येथील शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यकारी मंडळात वाद आहे. हा वाद न्यायप्रविष्ठ असून येथील मुख्याध्यापिका दीपश्री तुकाराम जाधव या २४ वर्षापासून शिक्षण संस्थेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे मुख्याध्यापिका पदाचा पदभार देण्यात आला आहे. संस्थेतील कनिष्ठ लिपिक पदाबाबत आठ महिन्यापूर्वी गुणानुक्रमे स्वप्निल शेळके याची निवड झाली होती. याबाबत राधिका श्रीराम साळुंके यांनी आक्षेप नोंदवला होता. याबाबत 20 मार्च रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात सुनावणी झाली त्यानंतर शनिवारी ता. २२ रोजी मुख्याध्यापिका दीपश्री तुकाराम जाधव ह्या दररोजच्या प्रमाणे शाळेमध्ये आपल्या कार्यालयातील कामकाज करत असताना राधिका श्रीराम सोळुंके व सुवर्ण श्रीराम सोळुंके यांनी कार्यालयात येऊन लिपिक पदाच्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या करून माझा प्रस्ताव का पाठवला नाही दुसऱ्या व्यक्तीचा प्रस्ताव कोणत्या आधारावर पाठवला आहे, अशी विचारणा केली. त्यांच्या नावाचे मस्टर का भरत आहात म्हणून मुख्याध्यापिकेला मारहाण करीत कार्यालयातील संगणक तोडफोड करून, हजेरीपत्र, हालचाल रजिस्टर, या सर्व विविध कागदपत्राची फडाफाडी केली.
त्याचबरोबर मुख्याध्यापिकेला मारहाण करत असताना कार्यालयातील काही कर्मचारी त्या ठिकाणी धावून आले त्यातील एकजण चक्कर येऊन पडला. दरम्यान एकीने मुख्याध्यापिकेला चाकूचा धाक दाखवत प्रस्तावावर सह्या कर म्हणून धमकी देण्याचा प्रयत्न केला. कार्यालया बाहेर काही अनोळखी तीन-चार पुरुष मंडळी उपस्थित होते. अशा परिस्थितीत त्यांच्या तावडीतून मुख्याध्यापिका श्रीमती जाधव यांनी सुटका करून समोरच असलेले पोलीस ठाणे गाठले व आपला जिव वाचवण्याचा प्रयत्न केला. दीपश्री जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.