

रेणापूर (लातूर) : रेणापूर जुलै २०२५ मध्ये घेतलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत रेणापूर येथील स्वातंत्र सैनिक मुर्गाप्पा खुमसे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वीजतंत्री विभागातील विद्यार्थी मदिया खदीर सय्यद हिने ९९.६६ टक्के गुण मिळवून भारतात दुसरे स्थान प्राप्त केले आहे. तिचा सत्कार ४ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात होणार आहे.
मदियाचे वडील खदीर सय्यद हे व्यवसायाने बांधकाम मजूर असून त्यांना पाच मुली आहेत. गरीब परिस्थिती असूनही त्यांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी कोणतीही कमतरता पडू दिली नाही. मदिया लहानपणापासूनच हुशार असल्याने तिच्या आई-वडिलांने तिला शिक्षणासाठी संपूर्ण सहकार्य केले. मॅट्रिकनंतर तिने रेणापूरच्या आयटीआयमध्य वीजतंत्री विभागात प्रवेश घेतला.
मी यशस्वी व्यक्तींच्या कथा वाचल्या त्यातून मला केवळ प्रेरणाच मिळाली नाही तर जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडे मिळाले. या सर्व गोष्टींचा विचार करून मी सतत अभ्यास केल. गरिबी असूनही कठोर परिश्रम, समर्पण आणि चिकाटीच्या जोरावर मी माझे स्वप्न पूर्ण करू शकले. या यशामध्ये माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
मदिया खदीर सय्यद, रेणापूर, लातूर
पहिल्या वर्षी तिने ६०० पैकी ५९६ गुण मिळवले, तर दुसऱ्या वर्षी ५९८ गुण मिळवून अखिल भारतीय स्तरावर दुसरे स्थान मिळवले. तिच्या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य व्ही. के. पडवळ, शिल्पनिदेशक अरविंद ताडेवाड, शिक्षक एजाज मुजावर आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे कौतुक केले आहे. मदिया सय्यदच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रेरणा घेत आहेत आणि तिचा गौरव सर्वत्र केला जात आहे.