दिल्लीच्या गणेशोत्सवावर लातुरकरांची छाप; २३ वर्षांपासून गणेश प्रतिष्ठापना

Ganeshotsav 2024 | लातुरच्या महेंद्र लड्डा यांनी सुरू केला उत्सव
Delhi Ganesh festival
दिल्लीत लातुरच्या महेंद्र लड्डा यांनी २३ वर्षांपूर्वी गणेशोत्सव सुरू केला. Pudhari Photo
Published on
Updated on

लातूर, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव तेजोमय करणारा गणेशोत्सव देशाचा लोकोत्सव व्हावा, यासाठी मराठी माणसे प्रयत्न करीत आहेत. राजधानी दिल्लीत लातुरच्या महेंद्र लड्डा यांनी २३ वर्षांपूर्वी सुरू केलेला गणेशोत्सव याचीच साक्ष देत असून तो दिल्लीची वेगळी ओळख बनला आहे. (Ganeshotsav 2024)

या उत्सवामागची कहाणी मोठी रंजक

या उत्सवामागची कहानी मोठी रंजक आहे, ४२ वर्षांपूर्वी महेंद्र लहा यांनी रोजगाराच्या शोधात दिल्ली गाठली होती. तेथे एका दुकानावर ३०० रुपये महिना पगाराची त्यांना नोकरी मिळाली. काही वर्षांनंतर त्यांनी आठ हजारांच्या भांडवलावर इलेक्ट्रीकल साहित्याचे दुकान सुरू केले. मेहनत, चिकाटी व प्रामाणिकपणामुळे त्यांचा व्यवसायात चांगलाच जम बसला. आज ते दिल्लीतील प्रतिष्ठित उद्योजक व समाजकारणी आहेत. ऋणातून उतराई होणे हा तर मराठी माणसाचा उपजत गुण. महेद्रही त्यास अपवाद राहिले नाहीत. दिल्लीने आपणाला सारे काही दिले, आपण दिल्लीला काय द्यावे? हा मनी घोळणारा प्रश्न त्यांनी त्यांच्या सौभाग्यवती सूर्यकलांशी बोलून दाखवला. (Ganeshotsav 2024)

महाराष्ट्राचा गणेशोत्सव आपण दिल्लीला देऊ

महाराष्ट्राचा गणेशोत्सव आपण दिल्लीला देऊ, असे उत्तर मिळाले व २००२ मध्ये गणेशोत्सव सुरू झाला. प्रारंभी महेंद्र व त्यांच्या तीन मित्रांनी दिल्लीच्या स्कोप टॉवरजवळील लक्ष्मीनगरात गणेशाची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर श्री गणेश सेवा मंडळ स्थापन झाले. राष्ट्रभक्ती व सामाजिक कार्याची जोडही उत्सवाला दिली.

गणेशोत्सावाला सामाजिक कार्याची झालर 

त्यामुळे अनेकजण या मंडळाशी जोडले गेले. आजघडीस मंडळाचे २५० सभासद असून उत्सवकाळात किमान ५० हजार भाविक श्रींचे दर्शन घेतात. १०० बाय ३८० फूट विस्ताराचा व २४ फूट उंचीचा देखणा मंडप हे या गणेशमंडळाची वेगळी ओळख असून त्यात ६ हजार भाविकांना विनाव्यत्यय कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो. विविध स्पर्धा, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. रक्तदान शिबिरे, मोफत नेत्रशस्त्रक्रियाची भव्य शिबिरे होतात. २००२ पूर्वी दिल्लीत केवळ महाराष्ट्र सदनात शासकीय स्वरूपात गणेशोत्सव होत होता. लड्डांनी तो सुरू केल्यानंतर तो तेथील घराघरांत पोहोचला आहे.

पर्यावरणपूरक मूर्ती अन् मराठीतून आरती

मंडपात १० फूट उंचीची फायबरची मूर्ती ठेवण्यात येते, तिच्यासमोर मातीची लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते . मंडपातच टबमध्ये तिचे विसर्जन केले जाते. प्रतिष्ठापनेपूर्वी मूर्तीची मिरवणूक काढली जाते, आरतीही मराठीतून होते. विशेष म्हणजे अमराठीही ती न अढखळता भक्तिभावाने म्हणतात. यावर्षी मंडळाने विकसित भारताचा देखावा उभारला होता.

दर्शनासाठी आलेल्या भाविका्ंची पादत्राणे अनेक कोट्यधीश व्यापारी स्वतः उचलून ठेवतात. सेवा स्वतः केली पाहिजे, हा गुरुद्वारातील मंत्र येथे प्रत्यक्ष आचरणात आणला जातो. मंडळाच्या समाजकार्याचे स्वरूप उत्सवापुरतेच सीमित नसून दरवर्षी आम्ही मोफत सामुहिक विवाह लावतो. आजतागायत २७० मुलींची लग्ने आम्ही लावली, त्यांना संसारोपयोगी साहित्यही दिले आहे.
- महेंद्र लड्डा, संस्थापक अध्यक्ष
Delhi Ganesh festival
नाशिक गणेशोत्सव 2024 : गणेश मंडळाचा अन्न प्रशासनाला ठेंगा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news