

लातूर; पुढारी वृतसेवा : सुमारे साडेनऊ वर्षांपूर्वी राज्यभर गाजलेल्या लातूर येथील शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कल्पना गिरी खून प्रकरणी महेंद्रसिंह विक्रमसिंह चौहान व समिर किल्लारीकर या दोघांना जन्मठेप तर खून प्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी पुरावे नष्ट केल्या प्रकरणी लातूरचे माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह चौहान, कुलदीप ठाकूर, प्रभाकर शेट्टी व सुवर्णसिंग ठाकूर या चौघांना तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर.बी. रोटे यांनी सुनावली आहे. या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते.
या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, २१ मार्च २०१४ रोजी रंगपंचमी दिवशी कल्पना गिरी या एका कार्यक्रमाचे निमित्त करुन लातूर येथील त्यांच्या घरातून गेल्या होत्या. तथापि त्या परत न आल्याने त्यांच्या वडीलांनी त्या हरवल्याची तक्रार २२ मार्च रोजी येथील एमआयडीसी पोलिसात नोंदवली होती. २३मार्च २०१४ रोजी कल्पना गिरी यांचा मृतदेह धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर जवळील पाचुंदा तलावात आढळला होता. आपल्या मुलीला पळवून नेवून तिचा खून करण्यात आल्याची तक्रार कल्पना यांच्या वडीलांनी २७ मार्च रोजी येथील एमआयडीसी पोलिसात दिली होती. याप्रकरणी २८ मार्च रोजी या प्रकरणी शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष महेंद्रिसंह चौहान व त्याचा मित्र समीर किल्लारीकर यांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणातील अन्य आरोपी प्रभाकर शेट्टी श्रीरंग ठाकूर, विक्रमसिंह चौहाण, कुलदीप ठाकूर व सुवर्णसिंग ठाकूर यांनाही अटक करण्यात आली होती. कट रचने व पुरावा नष्ट करणे असे आरोप त्यांच्यावर होते. सुरवातीला हे प्रकरण तुळजापूर पोलिसांकडे होते. त्यानंतर ते तेथील महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तपासासाठी देण्यात आले. लातूर येथे मिसींगची तक्रार दाखल झाल्यानंतर ते एम.आय.डी.सी. पोलिसांकडे आले. पुढे स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास देण्यात आला. तेथून ते लातूर सीआयडीकडे सोपविण्यात आले व त्यानंतर पुणे येथील सीआयडीच्या विशेष पथकाकडे त्याचा तपास देण्यात आला होता. त्यांनतर हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आले होते. तपासानंतर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्याची सुनावणी होत राहीली. सोमवारी (दि.९ आक्टोबर) रोजी या प्रकरणाचा निकाल लागला. १२६ साक्षीदार तपासण्यात आले त्यातील ४० फितूर झाले. सुमारे एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सीबीआयच्या वतीने अॅड. शहाजी चव्हाण यांनी या प्रकरणाचे काम पाहीले.