चाकूर : होऊ घातलेल्या अहमदपूर विधानसभा निवडणुकीसाठी चाकूर तालुक्यात मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सहा वाजल्यानंतर चाकूर शहरातील जि प केंद्रीय इंदिरानगर शाळेतील मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदाराच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.
चाकूर तालुक्यात अनेक गावातील मतदारांनी जवळपास मतदानाचा हक्क बजावला असून सायंकाळी पाचवाजेपर्यंत ६० टक्के मतदान झाले होते. दुपारच्या सत्रात मतदारांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली तर पाचच्यानंतर मतदारांनी गर्दी केल्याने तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान सुरूच होते. तालुक्यात १५५ मतदान केंद्रावर मतदान झाले असून चाकूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी १ लाख ५२ हजार १०५ मतदारापैकी ७९ हजार ७४६ पुरुष मतदार व ७२ हजार ३५८ स्त्री मतदार तर ०१ तृतिय पंथी मतदार यांचा समावेश आहे.(Maharashtra assembly poll)
यावेळी एकूण ९३० कर्मचारी मतदानासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. यावेळी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून तालुक्यात मतदान शांततेत पार पडले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तालुक्यातील १५५ मतदान केंद्रांवर पोलिसांकडून व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत यातच तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, आरोग्याच्या प्रथमोपचार आवश्यक सुविधा मतदान केंद्रांवर ठेवण्यात येऊन ताप, जखम, प्राथमिक औषधी, ओआरएस पावडर आदी सुविधा देण्यासाठी आशा कार्यकर्त्या व आरोग्य कर्मचारी यांनी व्यवस्था केली होती.(Maharashtra assembly poll)
चाकूर शहरात जगत जागृती माध्यमिक शाळेतील बूथ क्रमांक २८० येथे आदर्श मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली होती. याठिकाणी आलेल्या मतदारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
तालुक्यातील अनेक गावात निवडणूक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी भेटी देऊन पाहणी केली.या निवडणुकीत प्रामुख्याने तिरंगी लढत झाली असून वीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले आहे.
चाकूर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीच्या १५५ बूथ ठिकाणी कसलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनकडून २५० पोलीस कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर तैनात करण्यात आले असून त्यामध्ये ६ अधिकारी व राखीव पोलीस दलाचा समावेश होता.
नळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी भेट दिली असताना आपले कर्तव्य बजावताना एक वयोवृद्ध दिव्यांग मतदारास मतदान केंद्रावर व्हील चेअरवर स्वतः घेऊन जाऊन मतदान करून घेण्यासाठी माणुसकी दाखवून मदत केली.
चाकूर तालुक्यातील ७८ मतदान केंद्रांवर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती याची दक्षता प्रशासनाने घेतलेली होती.