Latur Scam : उदगीरमधील २,१४३ कोटींचा परदेशी निधी घोटाळा! श्याम कलानीला ९ दिवसांची पोलीस कोठडी

उदगीरमधील कारवाईने राज्यभरात खळबळ.
Crime News
पोलिस कोठडीPudhari File Photo
Published on
Updated on

उदगीर : तब्बल २१४३ कोटी ७९ लाख ४२ हजार ७६० रुपयांच्या परदेशी निधी गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सीए श्याम शिवप्रसाद कलानी (रा. न्यू मौढा रोड, उदगीर) याला अखेर न्यायालयाने ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी कलानी रविवारी (दि. २३) उदगीर शहर पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. आज त्याला उदगीर न्यायालयात हजर केले असता, तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत ९ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

परदेशी निधी पाठवण्याच्या व्यवहारासाठी खोटी प्रमाणपत्रे दिल्याच्या आरोपावरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात सीए श्याम कलानी याच्यासह अन्य १६ कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपआयकर संचालक, युनिट-१, छत्रपती संभाजीनगर येथील दीपक कुमार यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), २१४, २२९ व ३(५) अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत न्यू मौढा रोड, उदगीर येथून हा व्यवहार झाल्याचा आरोप आहे. खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे परदेशात निधी पाठविण्यास मदत केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. संबंधित १६ कंपन्या, त्यांचे बँक व्यवहार, प्रमाणपत्रे, आर्थिक कागदपत्रे आणि परदेशात पाठविलेल्या निधीच्या व्यवहारांची आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून तपासणी सुरू आहे.या व्यवहाराचे नेमके स्वरूप, प्रमाणपत्रांची सत्यता आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबत आरोपीकडे चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्या दृष्टीने तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news