

Shirur Anantpal Police
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ पोलीस प्रशासकीय हद्दीतील सांगवी घुग्गी येथील मनोज मधुकर बिरादार यांच्या ऊसाच्या शेतात पोलिसांनी एका धाडसी कारवाईत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गांजा जप्त केला आहे. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान ऊसाच्या फडातून एकूण८ किलो ६२० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, बाजारात या मुद्द्यामालाची किंमत ४ लाख ३१ हजार रुपये इतकी आहे. अंमली पदार्थांच्या विरोधात शिरूर अनंतपाळ पोलिसांनी उचललेले हे एक अत्यंत कठोर पाऊल मानले जात आहे.
या कारवाईचे गांभीर्य लक्षात घेता महसूल आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी स्वतः उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव, बनसोडे साहेब, जगताप साहेब, नायब तहसीलदार पदकोंडे, मंडळ अधिकारी नवनाथ खंदाडे आणि आंबा पाटील हे प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते.
या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊसाच्या शेतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा नेमका कोणी व कशासाठी लागवड केला होता किंवा आणून ठेवला होता, याबाबत पोलीस प्रशासनाकडून कसून तपास केला जात असून या रॅकेटमधील इतर म्होरक्यांचा शोध घेतला जात आहे.