निलंगा : निलंगा तालुक्यातील शिरोळ येथे पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. सलग सहा तास अतिमुसळधार पाऊस पडल्याने अनेक परिसरातील काही घरात पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान आहे.
शिरोळमधील गणेश कांबळे, पाशु सय्यद, शमु सय्मद, आयुब सय्यद यांच्या घरात पाणी शिरले असून रस्त्यांना अक्षरशः नाल्याचे स्वरूप आले आहे. सौदागर नागमोडे यांचे राहत्या घराची भिंत पडून मोठे नुकसान झाले आहे. गावात नाला नसल्याने पावसाचे पाणी घरात शिरत आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच ग्रामपंचायतने रस्त्यांच्या दुतर्फा नाला केला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
मुसळधार पावसामुळे संसार उघड्यावर आला असूनही प्रशासनाच्या वतीने परिस्थिती पाहणी करण्यासाठी कोणीही उपलब्ध नाही. ग्रामसेवक, तलाठी यापैकी अशा भयानक परिस्थितीत गावात कोणीही उपलब्ध नसून आम्ही दाद कुणाकडे मागायची ! आम्हाला कोणीच वाली नाही, असेही नुकसानग्रस्त नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामसेवक आणि तलाठी यांना दूरध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तालुक्याच्या ठिकाणी आमची बैठक आहे. ती बैठक झाल्यानंतर पाहणी करण्यास येतो, असे त्यांच्याकडून सांगण्यात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.