

निलंगा : निलंगा- देवणी तालुक्याला विभागणाऱ्या मांजरा नदीपात्रात गिरकचाळ- हेळंब येथे गौण खनिज विभाग लातूर आणी दोन्ही तालुकांच्या महसुल,पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करुन गिरकचाळ येथील मांजरा नदीपात्रातील वाळुच्या बोटी पकडल्या. दुपारपासूनच ही मोहीम सुरू होती.प्रशासनाने मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई केली.नदीपात्रात एकूण सहा बोटी सापडल्या असून अजूनही उशिरापर्यंत शोध मोहीम सुरूच आहे.
महसूल प्रशासनातर्फे अवैध धंद्यावर आळा बसवण्यासाठी निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या काही दिवसापासून कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असुन आज गिरकचाळ येथे ही कारवाई करण्यात आली.
गिरकचाळ नदीपात्रात अवैध वाळूचा उपसा होत असतानाचे व्हिडिओ महसुल आयुक्तांपर्यंत गेल्याने ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. या कारवाई वेळी परिसरातील बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी देवणी पोलीस आणि शिरूर अनंतपाळ पोलीस यांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. वाळुच्या बोटी जप्त करताना हद्दी संदर्भात शिरुर अनंतपाळ आणी देवणी पोलीसांमध्ये गुन्हा कुठल्या पोलीस स्टेशन अंतर्गत नोंद करायचा हा संभ्रम निर्माण झाला होता. हद्द कायम करुन एक गुन्हा देवणी पोलीस स्टेशनमध्ये आणी एक शिरुर अनंतपाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
या संयुक्त कारवाईत जिल्हा गौण खनिज अधिकारी महेश राठोड, निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, देवणी तहसीलदार सोमनाथ वाडकर,नायब तहसीलदार कुलदीप देशमुख,शिरु अनंतपाळ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे,देवणीचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक वराडे,निटुर आऊटपोस्ट चे सुधीर शिंदे,कदम,मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे,सुर्यवंशी, राजकुमार देशमुख, तलाठी रुपनर, बोटुळे,पोचापुरे हे सहभागी होते. याप्रकर्णी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.