Latur rain news: पाऊस सर्वदूर... नदीला पूर.. शेतकऱ्यांना अश्रू अनावर

Marathwada flood news update: देवणी तालुक्यात पावसाचा कहर, वलांडी मंडळासह तालुक्यात ढगफुटी
Latur rain news
Latur rain news
Published on
Updated on

सतीश बिरादार

देवणी : सलग तिसऱ्यांदा मांजरा नदीचा पूर शेतकऱ्यांच्या शेतात घुसला आहे. वरुन आभाळ फाटले अन् नदीचे पाणी शेतशिवारासह गावागावात शिरल्याने पाणीच पाणी चोहीकडे, शेतशिवार गेला कोणीकडे? असे विदारक चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. सतत पडणारा पाऊस, नदीला आलेला पूर व शेतशिवारात तुंबलेले पाणी पहाताना शेतकऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुटताना दिसतोय.

गेल्या पाच दशकात असा पाऊस व परिस्थिती कधीच पाहिली नाही असे वयोवृद्ध सांगतात. या पावसाने कहरच केला अख्खा शिवार पाण्यात बुडाला काय शोधावे...कुठे शोधावे...या विदारक परिस्थितीने शेतकऱ्यांच्या मनात काहुर माजविला. नदीकाठच्या गावात नासाडी झालेल्या पिकांची दुर्गंधी, चाऱ्याशिवाय दारात भिजत असलेली जनावरे टाहो फोडतानाचा आवाज काळजात चर्र करत आहे. दसरा-दिवाळी सण तोंडावर असताना हे सण उत्सव साजरे करण्याचे पाहिलेले शेतकऱ्याचे स्वप्न पाण्यात वाहिले आहे.

देवणी तालुक्यात शुक्रवारी (दि.२६ सप्टें) रात्रभर पावसाच्या मुक्कामानंतर शनिवारी (दि.२७) सकाळी अर्ध्या तासापासून मोठ्या पावसाला सुरुवात झाली होती. शासनाच्या दप्तरी वलांडी मंडळांत सर्वाधिक ९१ मि मी पावसाची नोंद झाली. तर देवणी मंडळात ५९ तर बोरोळ मंडळात ५३ मि मी पावसाची नोंद झाली. तालुक्यातील सरासरी ६७.६६ मि मी पावसाची नोंद झाल्याने ढगफुटी झाल्याचे समोर आले आहे. वलांडी मंडळात पावसाचा हाहाकार माजला आहे. पावसामुळे तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले.

खरीप हंगाम विशेषत: तालुक्याची अर्थ वाहिनी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सोयाबीन या पिकाला मोठा फटका बसला आहे. जवळपास २६ हजार हेक्टरवरील उभे पीक पूर्णता जलमय झाले आहे. तसेच तुर पीक पूर्णपणे नष्ट होत आहे. यामुळे जवळपास कोट्यावधी रुपयाचे शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे. आता नुकसान भरपाईसाठी शासनाकडे याचना करावी लागणार आहे.

तालुक्यातील उदगीर निलंगा राज्यमार्गावरील धनेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली. हेळंब गिरकचाळ लातुर, जवळगा साकोळ, शिवाजीनगर ते बोरोळ, बोरोळ सिधिंकामट हे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सोमनाथ वाडकर व पोनि भिमराव गायकवाड यांनी नागरिकांना सतर्कता बाळगावी असे आवाहन केले आहे.

वरुणराजाने देवही बुडविले

सततच्या मुसळधार पावसामुळे शनिवारी (दि.२७) देवनदीला पूर आला असून या पुरामध्ये नदीकाठचे विठ्ठल रुक्मिणी व महादेव मंदिर आणि पुंडलिकाचे मंदिर पूर्णतः पाण्यात आहेत. यावरुन वरुणराजाने देवही पाण्यात बुडविले तर नदीकाठच्या काही घरांमध्ये पाणी घुसले आहे. तसेच बाजूच्या शेतामध्ये पण पाणी घुसले आहे.यावरुन शेतकऱ्यांच्या नुकसानीबरोबर देवालाही बुडविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news