

रेणापूर : मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटियर लागू करून सरकारने ओबीसीचे आरक्षण संपवले आहे. ‘सरकारने ओबीसी विरोधी जीआर काढल्यामुळे मी माझे जीवन कायमस्वरुपी संपवत आहे’ अशी चिठ्ठी लिहून वांगदरी येथील भरत महादेव कराड (३५ ) या युवकाने मांजरा नदी पात्रात उडी घेवून बुधवारी (दि.१०) जीवन संपवले.
वांगदरी येथील भरत महादेव कराड हे ॲटो चालक होते. ते अनेक वर्षांपासून ओबीसीच्या आरक्षण आंदोलनात सहभागी असायचे. कांही दिवसांपूर्वी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी हैद्राबाद गॅझेटियर लागू केले. हे आरक्षण लागू केल्यामुळे ओबीसीचे आरक्षण कायमस्वरूपी संपल्याची भावना व्यक्त करून भरत कराड हा भावनिक झाला होता. ओबीसी समाजावर सरकारने अन्याय करू नये म्हणून अनेक आंदोलने केली असे कराड याने चिट्टीत नमुद करून सरकारने ओबीसींच्या आरक्षणा विरोधात जीआर काढल्याने मी माझे जीवन कायमस्वरूपी संपवत आहे.
माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा असा उल्लेख चिट्टीत करून बुधवारी (दि.१०) सांयकाळी वांगदरी शिवारात मांजरा नदीपात्रात घोषणा देत उडी घेवून आत्महत्या केली आहे. यावेळी सदर इसमास काही तरूणांनी वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात यश आले नाही. गुरुवारी त्याच्यावर वांगवरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान भरत कराड यांच्या अंत्यविधीला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. शोकाकुल नागरिकांनी ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे, भरत कराड याचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशा घोषणा दिल्या. मयत भरत कराड याच्या पश्चात , वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्याच्या नावावर केवळ २ गुंठे जमीन असून तो ॲटो चालवून कुटुंबाची उपजीवीका भागवित असे.