

शिरूर अनंतपाळ : लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथे शुक्रवारी (दि. २७) अवैध दारूविक्रीच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. गावाजवळील एका धाब्यावर अवैध दारूची विक्री होत असल्याचा आरोप करत मोठ्या संख्येने जमत महिला व नागरिकांनी धाब्याची तोडफोड केली आणि त्यानंतर तेथील साहित्य बाहेर काढून त्यास आग लावली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित धाब्यावर गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारूविक्री सुरू असून याबाबत पोलीस प्रशासन व संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रभावी कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत धाबा जाळल्याचा आरोप केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संतप्त नागरिकांनी पोलिसांना घेराव घालत अवैध दारूविक्रीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. शिवपूर परिसरातील सर्व बार व धाब्यांमधील कथित अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक बंदोबस्त तैनात केला असून, घटनेचा पुढील तपास सुरू असुन धाब्यावर अवैध दारूविक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.