

मुरूम (लातूर) : येथील श्वेता बापुराव पाटील यांच्या एचएफ गायीने राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांना मागे टाकत नागपूर येथे झालेल्या ॲग्रो-व्हिजन आयोजित दूध उत्पादन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ४४ लिटर दूध देणारी ही गाय राज्यात अव्वल ठरली आहे.
निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे शेती व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अडचणीत जात असताना शेतीला पूरक व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार आणि मदर डेअरी विविध योजना राबवत आहेत. अँग्रोव्हिजन या उपक्रमाचा भाग म्हणून गेल्या दहा वर्षांपासून कृषी प्रदर्शनांचे आयोजन केले जात आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील यांना राजकारणासोबतच पशुपालनाचीही आवड आहे. कोरोनाच्या काळात त्यांच्या कन्या श्वेता पाटील यांनी दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. सुरुवातीच्या आठ एचएफ गायींपासून सुरू झालेला हा गोठा आज ७० गायी आणि २५ म्हशींपर्यंत विस्तारला आहे. मदर डेअरीच्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांच्या ४४ लिटर दूध देणाऱ्या एचएफ गायीने प्रथम क्रमांक मिळवून गोठ्याची गुण-वत्ता सिद्ध केली. पाटील कुटुंबाचे दुग्ध उत्पादन क्षेत्रातील हे यश आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते श्वेता पाटील यांच्या प्रतिनिधी नागवेणी पाटील यांचा १५ हजार रुपयांचा धनादेश, मदर डेअरीची ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास कृषी मंत्री दत्ता भरणे, मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, डॉ. पंकज भोयर व एनडीबीबीचे डॉ. मनीष शहा यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
मुरूम आणि परिसरातील अनेक युवक दुग्ध व्यवसाय शिकण्यासाठी पाटील यांच्या शेताला भेट देतात. गोठा व्यवस्थापन, चारापाणी नियोजन आणि दैनंदिन देखभाल याबाबत माहिती देत बापुराव पाटील हे पशुपालन व दुग्ध व्यवसायासाठी उपलब्ध योजनांचे मार्गदर्शन करून तरुणांना जोडधंद्याकडे वळविण्याचे काम करीत आहेत.