Latur News | अहमदपूरात मतदान मोजणीची यंत्रणा सज्ज

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उद्या सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ
Latur News
Latur News
Published on
Updated on

अहमदपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतमोजणीच्या पाश्र्वभूमीवर शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ९ फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात होणार असून या मतमोजणीसाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

तालुक्यातील ६ जिल्हा परिषद व १२ पंचायत समिती गणासाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. तालुक्यातील २०० मतदान केंद्रावर ८३९४६ पुरुष व ७६७४७ अशा एकूण १६०६९३ मतदारांपैकी ५४८९५ पुरुष व ४९७८४ स्री अशा १०४६७९ मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला.सरासरीच्या ६५•१४ % मतदान शांततेत पार पडले आहे.

जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी २७ व पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ३८ उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून त्याच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सज्ज झाले आहे.

मतमोजणीसाठी मुख्य सभागृहात १४ टेबल असून,आपत्कालीन स्थितीसाठी ४ टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत.पोस्टल मतपत्रिकेसाठी स्वतंत्र ३ टेबल आणि २ राखीव टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.मतमोजणीची प्रक्रिया निर्दोष पार पाडण्यासाठी प्रत्येक टेबलवर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.प्रत्येक टेबलवर एक क्षेत्रीय अधिकारी,एक मास्टर ट्रेनर,एक सहाय्यक कर्मचारी व शिपाई असे चार जणांचे पथक कार्यरत राहणार आहे.

या महत्त्वपूर्ण कामासाठी स्ट्राँग रूम नियंत्रणाची जबाबदारी नायब तहसीलदार संतोष अनर्थे व संजय भोसीकर, संगणक कक्षाची जबाबदारी नायब तहसीलदार अभिलाष जगताप ,टॅब्युलेशनची जबाबदारी उपकोषागार अधिकारी जी. एन. गोपवाड,साहित्य पुरवठा नामदेव अर्जुने व भोजन व्यवस्था पुरवठा निरीक्षक शुभांगी जवादे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नियंत्रणात कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीत पारदर्शकता राहावी यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी व इतरत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.मतमोजणीचे चित्रीकरणही केले जाणार आहे.कोणत्या पक्षाला कौल मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news