

चाकूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससेवेतील भोंगळ कारभाराचा प्रत्यय बुधवारी (दि.९) दुपारी चाकूर बसस्थानकात आला. बसच्या दर्शनी भागावर मार्गाची पाटी नसलेली बस थेट बसस्थानकात येऊन थांबल्याने प्रवाशांचा चांगलाच गोंधळ उडाला. बस नेमकी कुठून आली आणि पुढे कुठे जाणार, याची माहिती प्रवाशांना मिळत नसल्याने अनेक प्रवासी संभ्रमात पडले.
चाकूर बसस्थानकात प्रवाशांची मोठी वर्दळ असताना (एमएच ०८ एपी ५७२६) क्रमांकाची बस बुधवारी दुपारी साडेतीन वाजता स्थानकात दाखल झाली. मात्र, बसच्या पुढील भागावर मार्ग दर्शविणारी पाटी नसल्याने प्रवाशांना ही बस कोणत्या मार्गावर जाणार आहे, याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे बसमध्ये चढायचे की नाही, याबाबत प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला.
चालकाकडे विचारणा केली असता ही बस नांदेडला जात असल्याचे स्पष्ट झाले. प्रवाशांना बसच्या मार्गाची माहिती सहजपणे मिळणे, ही मूलभूत बाब असताना अशा प्रकारे विनापाटीची बस स्थानकात येणे हा परिवहन विभागाचा गलथान कारभार मानायचा की बेफिकीरपणा? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक बसची दिशा, मार्ग व ती कुठून कुठे जाणार हे स्पष्टपणे दर्शविणारी पाटी असणे आवश्यक आहे. मात्र, याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे. प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे गांभीर्याने पाहून विनापाटीच्या बसेस स्थानकात येणार नाहीत, याची दक्षता घेण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकाराला जबाबदार कोण? असा सवाल करत संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली.