Latur Mayor | लातूर महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी...
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे यांची तर उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांची वर्णी लागली आहे. काँग्रेस तर्फे या दोन्ही उमेदवारांनी आज अधिकृत नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी त्यांच्या नावांची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन 47 जागा जिंकल्या होत्या. तर प्रतिस्पर्धी भाजपने 22 आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा विजयी झाली होती. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचा महापौरव उपमहापौर होणार हे निश्चित होते. विभागीय आयुक्तांनी लावलेल्या महापौर व महापौर निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार गुरुवारी (दि.५) दुपारी १ वाजता काँग्रेस पक्षाच्या प्रभाग १२ मधून विजयी झालेल्या नगरसेविका जयश्री भालचंद्र सोनकांबळे यांनी महापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र नगर सचिवांकडे दाखल केले. तर उपमहापौर पदासाठी प्रभाग ८ मधून विजयी झालेले ॲड. स्नेहल उटगे यांनी उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन दाखल केले.
भाजप कडून एकही उमेदवारी अर्ज खरेदी झालेला नाही. त्यामुळे महापौर व उपमहापौर निवडणूक येत भाजप अलिप्त राहणार असे दिसते. दरम्यान, 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेमध्ये महापौर व उपमहापौर नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.

