निलंगा, पुढारी वृत्तसेवा : निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथील सर्वे नंबर ३७७ व ३६९ मधील जमिनीच्या तक्रारदाराच्या आईच्या बाजूने कलम ५४ सीआरपीसी अन्वये तहसीलदारांनी निर्गमित केलेल्या आदेशाची छायांकित प्रत देण्यासाठी १ हजाराची लाच स्वीकारताना कोतवालास रंगेहाथ पकडण्यात आले.
तक्रारदार यांची आई भारतबाई सुभाष शिंदे (रा. अजनी बु., ता. शिरूर) यांची त्यांच्या वडिलांच्या नावे शिरोळ वांजरवाडा (ता. निलंगा) येथे वडिलोपार्जित जमीन आहे. सदर जमीन सर्वे नंबर ३७७ व ३६९ मधील शेतजमिनी संदर्भात वाटणी होऊन ताबा मिळण्यासाठी दिवाणी न्यायालय निलंगा दिवाणी दावा दाखल केला होता. दिवाणी न्यायालय, निलंगा यांनी तक्रारदाराच्या आईच्या बाजूने निकाल दिलेला आहे. सदर निकोलाविरुद्ध तक्रारदाराच्या आईचे भाऊ बबन निवृत्ती जाधव यांची मुलगी माधवी बब्रुवान जाधव हिने उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे रिट पीटिशन अपील केले आहे. सदर अपील उच्च न्यायालयाने ३ जानेवारी २०२५ रोजी फेटाळले आहे.
त्यावरून तक्रारदारांनी २७ मार्चरोजी तहसीलदार निलंगा यांना उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील आदेशाची प्रत जोडून शेत जमिनीचा ताबा देण्या बाबत विनंती अर्ज सादर केला होता. तक्रारदाराच्या अर्जावर तहसीलदारांनी निर्गमित केलेल्या आदेशाची छायांकित प्रत देण्यासाठी आरोपी कोतवाल राहुल बालाजी मरे यांनी तक्रारदार यांच्याकडे १ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा लावला. पंचासमक्ष एक हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.