

जळकोट, पुढारी वृत्तसेवा : जळकोट शहरातील अविनाश दत्तात्रय गबाळे यांच्या घरात शनिवार (दि.११) सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घरातील 5 जण जखमी झाले. चौघांवर जळकोट येथेच उपचार करण्यात आले. तर एक गंभीर जखमीवर उदगीर येथे उपचार सुरू आहेत.
अविनाश गबाळे यांच्या घरी स्वयंपाकघरात नवीन गॅस सिलिंडर लावण्यासाठी सिलिंडरचे सील काढताच गॅस गळती सुरु झाली. स्वयंपाकघरात देवाजवळील दिवा प्रज्वलित असल्याने सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत अविनाश दत्तात्रय गबाळे (वय 47), मीरा अविनाश गबाळे (वय 35), प्रशांत दत्तात्रय गबाळे (वय 42), अमृता प्रशांत गबाळे (वय 32), सर्वज्ञ प्रशांत गबाळे (वय 12) यांचे पाय भाजले. प्रशांत गबाळे यांची जखम गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उदगीर येथे दाखल केले आहे. या स्फोटात संसारोपयोगी साहित्य जळून वित्त हानी झाली आहे.