Latur Heatwave : उष्माघातामुळे दोन बैलांचा मृत्यू; सावरीतील शेतकऱ्यावर दीड लाखांचे संकट

Heatwave
Heatwave
Published on
Updated on

औराद शहाजानी (लातूर) : निलंगा तालुक्यातील सावरी गावात वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे दोन बैलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेमुळे शेतकरी मदन श्रीरंग भंडारे यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. मृत बैलांची अंदाजे किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी मदन भंडारे यांच्या मालकीचे दोन बैल बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शेतात मृत अवस्थेत आढळून आले. यामध्ये एक बैल पांढऱ्या रंगाचा असून त्याचे वय अंदाजे ३ वर्षे होते, तर दुसरा काळ्या रंगाचा असून त्याचे वय सुमारे ३ वर्षे ३ महिने असल्याचे सांगण्यात आले.

सदर बैलांकडून सकाळच्या वेळी नांगरणीचे काम करून घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना झाडाखाली सावलीत बांधण्यात आले. दुपारनंतर पुन्हा शेतकामासाठी त्यांचा वापर करण्यात आला. संध्याकाळी काम आटोपल्यानंतर बैलांना शेतात बांधून शेतकरी गावाकडे गेला होता. रात्री शेतात परत आल्यानंतर दोन्ही बैल जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच तलाठी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. औराद शहाजानी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी ठाकूर यांनी शवविच्छेदन केले. प्राथमिक अहवालानुसार, वाढत्या तापमानामुळे उष्माघात झाल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांना जनावरांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात जनावरांना झाडाखाली सावलीत बांधावे, पुरेसे पाणी द्यावे तसेच दुपारच्या तीव्र उन्हात कामाला लावू नये, असे त्यांनी सांगितले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाढत्या तापमानाचा फटका आता जनावरांनाही बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी जनावरांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news