Latur flood news: उदगीर तालुक्यात अतिवृष्टी; १३ गावचा संपर्क तुटला

marathwada flood news: सततच्या या पुराच्या पाण्यात नागरिकांना दैनंदिन कामासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय
Latur flood news
Latur flood news
Published on
Updated on

जावेद शेख

उदगीर: तालुक्यातील परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसाने शनिवारी (दि.२७) सकाळी अनेक गावात अतिवृष्टी झाली. यामुळे तालुक्यातील पेरा गावचा संपर्क तुटला होता. तालुक्यातील अनेक गावात नदी नाल्यांना पूर आला आहे. सततच्या या पुराच्या पाण्यात नागरिकांना दैनंदिन कामासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. सतत येणाऱ्या पुरामुळे अनेक गावच्या फुलाची उंची वाढवणे आवश्यक आहे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे,

उदगीर तालुक्यात पावसाचा धडाका सुरू असून शुक्रवारी (दि.२६) रात्रभर झालेल्या पावसामुळे तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला. आधीच मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर आहे, त्यातच पावसाचा जोर कायम असल्याने उदगीर तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील १३ गावांना उदगीर शहराला जोडणारे अनेक रस्ते बंद होते आणि एक गावच्या रस्त्यावरून पाणी जात असल्यामुळे उदगीर शहराचा संपर्क तुटला होता. दरम्यान येथील नागरिक स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यातूनच प्रवास करत आहेत.

शुक्रवारपासून उदगीर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यामुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, मच्छीमार बांधवांचीही मोठी हानी झाली आहे.

रस्त्यांवर पाणी, १३ गावांचा संपर्क तुटला

सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे उदगीर तालुक्यातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. उदगीर ते देगलूर, उदगीर ते नेत्रगाव, हैबतपूर पाटी ते हैबतपूर, बोरगाव, शेकापूर, भाकसखेडा ते नरसिंगवाडी, देवर्जन ते हणमंतवाडी, मोघा ते रावणगाव, रावणगाव ते शिवशंकर नगर, मादलापूर, होनिहिप्परगा, वाढवणा ते शिवणखेड आणि उदगीर ते अहमदपूर (वायगाव पाटी) या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे उदगीर तालुक्यातील एकूण १३ गावांचा संपर्क तुटला आहे. विशेषतः, अनेक गावांना जोडणाऱ्या पुलांची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते. या पुलांची उंची वाढवण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे

तिरू मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, शेतकरी-मच्छीमारांचे नुकसान

हाळी हंडरगुळी आणि वाढवणा येथील तिरू मध्यम प्रकल्प तुडुंब भरला असून, त्याच्या सांडव्यावरून अंदाजे पाच ते सहा फूट उंचीवरून पाणी वाहत आहे. या अतोनात पावसामुळे तिरू नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके आणि सुपीक माती वाहून गेल्याने जमिनी खडकाळ बनल्या आहेत. याचबरोबर, या तलावावर उपजीविका अवलंबून असलेल्या शेकडो मच्छीमारांचेही मोठे नुकसान झाले आहे. तलावात सोडलेली जाळी आणि मासेमारीचे साहित्य वाहून गेल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news