

चाकूर : ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपीने वाहनाचा अपघात उघडून आणत पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा प्रयत्न फसला. आरोपीने स्टेरिंग वळविण्याचा प्रयत्न केल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी एका दुचाकीला धडकली. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि.८) सायंकाळी ४.३० वाजता लातूर-नांदेड महामार्गावरील एका हॉटेलजवळ घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मुंबई येथील एका ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला चाकूर तालुक्यातील रोहीणा येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर डीआरआयचे (महसुल गुप्तचर संचालनालय) पथक त्याला लातूरकडे घेवून निघाले होते. ते लातूर-नांदेड मार्गावरील एका हाॅटेल जवळ आले असता आरोपीने चारचाकी वाहनाचे स्टेरींग फिरविले. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व पथकाची गाडी रस्त्याच्या कडेला जावून हाॅटेलसमोरील दुचाकीला धडक धडकली. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. डीआरआय पथकातील अधिकारी व कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी चाकूर पोलिसात संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.