Latur Crime | लातूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात १६ लाखांची चोरी!

रात्री सुरक्षा रक्षक नाही; सीसीटीव्हीही बंदच
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

लातूर : लातूर जिल्हा परिषद अध्यक्षा उषा संभाजी पाटील तळेगावकर यांच्या लातूर शहरातील शासकीय बंगल्यात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी १६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यात १२ लाख रुपयांची रोकड आणि सुमारे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आहेत. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल तक्रारीनुसार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उषा पाटील तळेगावकर व त्यांचे पती संभाजी पाटील तळेगावकर हे बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूम मधील लोखंडी कपाट फोडून त्यातील १२ लाख रुपये रोख तसेच सोन्याचे झुमके, मंगळसूत्र, सरपाळे आणि चार गोटे असे सुमारे चार लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. कपाटातील कागदपत्रे व कपडेही अस्ताव्यस्त करण्यात आले.२० सप्टेंबर रोजी सकाळी चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाला उपमंत्र्याचा दर्जा असल्याने त्यांच्या शासकीय निवासस्थानाची सुरक्षा सक्षम असणे अपेक्षित आहे. मात्र, या बंगल्यावर रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नसल्याचे समोर आले आहे. तसेच बंगल्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले तरी ते अद्याप कार्यान्वित नसल्याची माहिती आहे. सीसीटीव्ही सुरू करण्याबाबत संबंधित बांधकाम विभागाला वारंवार कळविण्यात आले होते, तरीही कार्यवाही झाली नसल्याची चर्चा आहे. सुरक्षा रक्षकाची अनुपस्थिती आणि बंद सीसीटीव्हीमुळे बंगल्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news