

उदगीर : न्यायालयाचा कायमस्वरूपी मनाई हुकूम असतानाही उदय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर काही प्रस्थापितांनी ५०-६० गुंडांच्या मदतीने बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा खळबळजनक आरोप संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या अन्यायाविरुद्ध दाद मागूनही प्रशासन ढिम्म असल्याने संतप्त झालेल्या वृद्ध प्राध्यापकांनी बुधवारी (१० फेब्रुवारी) सकाळी सामूहिक गळफास लावून आत्मदहन करण्याचा टोकाचा पवित्रा घेतला.
मात्र पोलीस प्रशासन ॲक्टीव्ह मोडवर येत परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर नगरपरिषद व पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, उदय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर न्यायालयाचा स्थगिती आदेश आहे. असे असतानाही, २० फेब्रुवारी रोजी राजेश्वर निटुरे यांनी ५० ते ६० अज्ञात इसमांना सोबत घेऊन या जागेवर जबरदस्तीने लोखंडी पोल उभे केले आणि अतिक्रमण केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संस्थेच्या अध्यक्षांनी दिलेल्या निवेदनानुसार, या अतिक्रमणाबाबत प्रशासनाला वारंवार लेखी तक्रारी देण्यात आल्या. मात्र, आठवडा उलटूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. निटुरे कुटुंब हे राजकीय शक्तीचा वापर करून आम्हाला त्रास देत आहे, आणि त्यांच्या दबावापोटीच प्रशासन डोळेझाक करत आहे, असा थेट आरोप पीडित प्राध्यापकाने केला आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी आणि न्यायाच्या मागणीसाठी संस्थेच्या सभासदांच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रत्यक्ष घटनास्थळी गळफास आंदोलन केले.
अतिक्रमण करण्यासाठी रोवण्यात आलेल्या लोखंडी पाईपच्या सांगड्याला गृहनिर्माण संस्थेचे सदस्यांनी सामूहिक गळफास आंदोलन करताना वेळीच नगरपरिषद व पोलीस प्रशासन ॲक्टीव्ह मोडवर येत आंदोलकांच्या गळ्यातील गळफास काढून नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने अतिक्रमण हटवले व तेथील साहित्य नगरपरिषदेने आपल्या ताब्यात घेतले. सदर परिसर हा नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन यांचा प्रभाग असल्याने त्यांनी नगरपरिषदेच्या वतीने महत्त्वाची भूमिका बजावली.