

लातूर : प्रशासकीय कार्य अन उपक्रमात सहविचाराचा आदर करीत सर्वांना सामावून अन समजून घेणाऱ्या अधिकारी अशी ओळख निर्माण केलेल्या लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची मुंबईला बदली झाली. शनिवारी (दि.४) त्यांनी लातूरचा पदभार सोडला यावेळी तेथे उपस्थित महिला अधिकाऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुटला या भावनिक क्षणाचे साक्षीदार असलेल्यांनाही गहिवरुन आले.
अधिकारी –कर्मचाऱ्यांसाठी बदली ही तशी प्रशासकीय बाब असते व ती सर्वांना स्वीकारावीही लागते. तथापि बदलीच्या वेळी सहकाऱ्यांचा गहिवर दाटून येणे हे अभावानेच एखाद्या अधिकाऱ्यांच्या वाट्याला येते. यासाठी तेवढे भावनिक नाते दृढ असावे लागते. वर्षा ठाकूर यांनी ते जपले अन जगलेही होते.
जुलै २०२३ मध्ये त्यांनी लातुरच्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे या नियुक्तीने त्यांना लातूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून एक अमिट ओळख दिली. प्रारंभीपासूनच त्यांनी सर्वांशी संवाद वाढवला. अधिकारी आहे असा बडेजाव त्यांनी दाखवला नाही. बॉडीगार्ड, शिपाई असो की अन्य कर्मचारी सर्वांना त्यांनी समजून घेतले. एखाद्या उपक्रमाचे यश व्यापक सहभाग व सहविचारावर अवलंबुन असते हे त्यांना ज्ञात असल्याने त्यांनी टिम वर्कला विशेष महत्व दिले.
अडचणी जाणून घेतल्या त्या सोडवण्यासाठी पाठबळही दिले. आपण सर्वोत्कृष्ट काम कसे करु शकतो? याचा वस्तुपाठच घालून दिला. त्या आम्हाला आमच्या कुटूंबातीलच वाटत असत. त्यांचे रागावणे्ही आम्हाला हवेहवेसे वाटायचे कारण त्यातूनही आम्ही शिकत गेलो. निरोप देताना त्यांच्या सहवासातील सारा पट नजरेसमोर लख्ख झाला. अडीच वर्षाच्या कार्यकालात त्यांच्या मार्गदर्शन अन नेतृत्वाखाली अनेक लोकोपयोगी कामे करता आली. केलेल्या कामाला राज्यस्तरावर ओळख मिळाली अनेक पुरस्कारही मिळाले त्यांची आठवण व प्रेरणा आम्हाला सदा सर्वदा प्रेरणादायी राहील अशी भावना लातुरच्या उपविभागीय अधिकारी रोहीणी विरोळे यांनी व्यक्त केली.
वर्षा मॅडमनी प्रशासकीय कामात आपली वेगळी ओळख दिलीच त्यापलिकडे जावून त्यांनी सामान्यांसाठी जपलेली संवेदना माणुसकी ज्योतीर्मय करणारी होती. आपले प्रश्न घेवून अनेक लोक अधिकाऱ्यांच्या दारात येतात. यातील अनेकांना अधिकाऱ्यापुढे कसे व्यक्त व्हावे? हे समजत नाही, त्यांच्या ओळखी पाळखीचे कोणी नसते अन त्यांनाही कोणी ओळखत नसते. अशा अनोळखी जनता जनार्दनाबद्दल त्यांना मोठी कणव होती. त्यांचे चेहरे हावभाव वाचून त्यांना त्या समजून घेत व त्यांचे प्रश्न मार्गी लावत असत असे कितीतरी किस्से आम्ही- पाहीले अनुभवले. त्यांच्याकडून खुप काही शिकता आले. विशेष म्हणजे महिला अधिकारी म्हणून आम्हाला त्यांचा मोठा आधार वाटायचा. असे नाते जपलेल्यांना निरोप देताना डोळे भरुन येणे ही अंतरंगाची अभिव्यक्ती असते अशी भावना उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे सावित्रींच्या लेकींच्या या गहिवराचा साक्षीदार होताना जिल्हाधिकीरी वर्षा ठाकूर यांनाही अश्रू लपवता आले नाहीत.