

किनगाव - अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस ठाण्यात अमित रमेश चव्हाण या युवकाला किनगाव पोलीसांनी एका प्रकरणात अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले होते. दिनांक २२ रोजी संध्याकाळी किनगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. पोलिस प्रक्रिया सुरू असताना पहाटे त्या युवकाने पोलीस ठाण्यातील रूममध्ये गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे किनगाव पोलीस ठाण्यात सोमवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अमित रमेश चव्हाण (वय २१, रा. मरशिवणी, तालुका अहमदपूर) येथील असून त्याला अहिल्यानगर येथून किनगाव पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याला रविवारी रात्री किनगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. पुढील कार्यवाही सुरू असताना पहाटेच्या वेळी या युवकाने ठाण्यातील रूममध्ये गळफास घेतला.
या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी किनगाव पोलिस ठाणे गाठले. नातेवाईक यांनी सुरुवातीला किनगाव पोलीस ठाण्याचे इन्चार्ज व पोलीस उपनिरीक्षक आणि पोलिस कर्मचारी यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली. यानंतर लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.
पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर मृतदेह लातूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू झाली. नंतर रुग्णवाहिकेमध्ये मृतदेह ठेवण्यात आला.
मृतदेह घेऊन रुग्णवाहिका निघाली असता नातेवाईकांनी काही वेळ ठिय्या मांडला. पोलीस अधीक्षक यांनी पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून गाडी लातूरकडे रवाना केली. लातूर येथे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली..
त्या युवकाने किनगाव पोलीस ठाण्यात जीवन संपवले, यावरून उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. त्याला ठाण्यात मारहाण झाली का, त्याला टॉर्चर केले गेले का अन्य काही घडले का, यावरून वेगवेगळी चर्चा सुरू आहे. ड्यूटीला असलेले पोलिस कर्मचारी व अधिकारी त्यावेळी कुठे होते, याबद्दल शंका निर्माण केल्या जात आहेत. याप्रकरणी सत्य बाहेर येणे गरजचे असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक यांनी केली आहे.