Latur Accident | उन्हाच्या तडाख्यात कार पेटली, अहमदपूरनजीक बर्निंग कारचा थरार!

वाढत्या तापमानामुळे गाडीच्या इंजिनमध्ये ओव्हरहीटिंगने आग लागल्याचा अंदाज : कार जळून राख, सुदैवाने जीवितहानी टळली
Latur Accident
Latur Accident
Published on
Updated on

अहमदपूर : तापमानात प्रचंड वाढीचा फटका एका कार मालकालाला बसला असून एका कारने अचानक पेट घेतली.चालकाने प्रसंगावधान राखून बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली असून कार मात्र संपूर्ण जळून राख झाली आहे.

हा बर्निग कारचा थरार २१ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास टाकळगावपाटी जवळ घडला आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी की शिंदगी बुद्रुक ता.अहमदपूर येथील प्रशांत कमलाकर मुळे हे आपल्या खाजगी कामानिमित्त टाटा कंपनीच्या नेक्साॅन क्रमांक एमएच.५५ बी.०१९० या कारने काही खाजगी कामानिमित्त गंगाखेड येथे गेले होते.तिथले आपले काम आटोपून ते खंडाळी मार्गे अहमदपूरकडे परत येत होते. दुपारी दोनच्या सुमारास कडक उन्हात त्यांची गाडी अहमदपूरनजीक टाकळगाव पाटीजवळ आली असता, अचानक गाडीच्या समोरच्या बोनेटमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याचे चालक प्रशांत मुळे यांच्या लक्षात आले.

त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडी तात्काळ रस्त्याच्या बाजूला घेतली आणि नेमका धूर कुठून निघतोय हे पाहण्यासाठी ते खाली उतरले. ते उतरत असतानाच गाडीने अचानक रौद्ररूप धारण करत पेट घेतला. ​कारला लागलेली आग एवढी भीषण होती की काही वेळातच आगीच्या ज्वालांनी संपूर्ण गाडीला वेढले. या घटनेची माहिती मिळताच अहमदपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

अग्निशामक दलाचे अधिकारी कैलास सोनकांबळे, ड्रायव्हर कम ऑपरेटर अजित अंगद लाळे आणि फायरमॅन प्रशांत गायकवाड यांनी तातडीने बंबासह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत आगीची तीव्रता जास्त असल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती. सुदैवाने धूर निघत असतानाच चालक वेळीच खाली उतरल्यामुळे या मोठ्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.वाढत्या तापमानामुळे गाडीच्या इंजिनमध्ये ओव्हरहीटिंग किंवा शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news