Latur Accident |‎ करजखेडा येथे भरधाव जीपची दोन कारला धडक : भीषण अपघातात एक ठार, दोन गंभीर
Latur Accident |‎ करजखेडा येथे भरधाव जीपची दोन कारला धडक : भीषण अपघातात एक ठार, दोन गंभीर

Latur Accident |‎ करजखेडा येथे भरधाव जीपची दोन कारला धडक : भीषण अपघातात एक ठार, दोन गंभीर

जीप चालक मद्यधुंद अवस्थेत ; रविवारी दुपारी अपघात,
Published on

‎औसा : ‎तुळजापूर तालुक्यातील करजखेडा चौरस्ता येथील उड्डान पुलावर दोन कार व एका जीपचा भिषण अपघात झाला. यामध्ये औसा तालुक्यातील आलमला येथील एकजण जागीच ठार झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी घडली असून याप्रकरणी जीप चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

‎तुळजापूरकडून औसा शहराकडे कार (एमएच 25, येडब्ल्यू 4361) जात होती. कारला त्याच दिशेने जात असलेल्या जीपने (एमएच 45, एझेड 5449) जोरदार धडक दिली. यामुळे कार उलटून पडली. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. यानंतर जीप वेगात असल्यामुळे ती रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला गेली. त्यावेळी तुळजापूरच्या दिशेने जाणाऱ्या औसा तालुक्यातील कारला (एमएच 24, एएफ 1599) जीपने धडक दिली. यामुळे ही कारही उलटली. यामधून प्रवास करणारे जीवन बसवंतराव पाटील (67, रा. आलमला, ता. औसा) जागीच ठार झाले. तसेच याच कारमधील नित्यानंद मोहन बुके (35), मोहन बुके (65) गंभीर जखमी झाले आहेत. अर्जुन पडुळे (35) व चेतन बुके (30, चौघे रा. आदर्श कॉलणी, लातूर )यांनाही मोठी दुखापत झाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहिती नुसार जीपने दुभाजक ओलांडत असताना झाडेही उध्वस्त केली. जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत जीप चालवत होता. बेंबळी (ता. धाराशिव) पोलिस ठाण्यात समजल्यानंतर जीप चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

‎जोराचा आवाज, किंकाळ्यांनी परिसर हादरला---

‎‎"अपघात झालेल्या उड्डानपुलाच्या खालीच मी वरात पाहत थांबलो होतो. तेव्हा अचानक मोठा आवाज झाला. सुरुवातीला आवाज कोठून आला समजलेच नाही. नंतर पुलावरच गोंधळ सुरू होता. मी पळतच पुलावर गेलो तेव्हा दोन कार व जीपचा अपघात झाल्याचे दिसून आले. एका कारमध्ये अत्यंत दयनिय अवस्था होती. एकजण जागीच ठार झाला होता. दुसरे जखमी जोरात ओरडत होते. त्यांना दगडाने पत्रा फाडून व काच फोडून बाहेर काढले. पोलिस व रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, जखमींची अवस्था गंभीर असल्यामुळे मालवाहू पिकअपमधून त्यांना तुळजापूरला पाठवले." ‎सुधीर भोसले, सरपंच,करजखेडा

‎‎लातूरहुन सोलापूर कडे जात होते बुके कुटुंबीय

‎ काही खाजगी कामानिमित्त मोहन बुके व त्यांचे कुटुंबीय आणि आलमला येथील त्यांचे मावस बंधू कारने जात असताना अचानक विरुद्ध दिशेने आलेल्या वेगवान जीपने कारला जोराची धडक दिली. यात कारमधील आलमला येथील जीवन पाटील यांच्या जागीच मृत्यू झाला.

‎शोकाकुल वातावरणात आलमला येथे अंत्यसंस्कार

‎‎ जीवन पाटील हे औसा तालुक्यातील आलमला येथील एक व्यापारी होते. मुख्य चौकातच त्याचे स्टेशनरी दुकान होते. त्याच्या अपघाती निधनाची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. त्याच्यावर रात्री 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, भाऊ, भाऊजया, मुलगा, सून, मुलगी असा मोठा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news