Latur Accident : कार-ऑटोची भीषण धडक; अपघातानंतर सीएनजी ऑटोचा थरकाप उडवणारा स्फोट

उदगीर-जळकोट राष्ट्रीय महामार्गावरील घटना
Latur Accident News
Latur Accident News
Published on
Updated on

उदगीर : उदगीर-जळकोट राष्ट्रीय महामार्गावर कार आणि सीएनजी ऑटो रिक्षा यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर ऑटोमधील सीएनजी टाकीचा मोठा स्फोट होऊन ऑटोने पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ऑटो जळून खाक झाली. ही घटना शनिवारी (दि.७) दुपारी एकच्या दरम्यान घडली. ऑटो चालकाने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असून तो मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कार (क्र. MH २६ V ३७६०) आणि सीएनजी ऑटो (क्र. MH १२ YL ४१८१) ही दोन्ही वाहनांची नळगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, ऑटोमधील सीएनजी टाकीचा मोठा स्फोट झाला आणि बघता बघता संपूर्ण ऑटो आगीच्या ज्वालांच्या विळख्यात सापडला.

ऑटोचालक ऑटोत एकटाच होता. धडकेनंतर तो तातडीने ऑटोतून बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला. ऑटो आगीत भस्मसात होत असताना परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ऑटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मृत्यू समोर दिसत असतानाही चालकाने वाचवला जीव!

धडकेनंतर सीएनजी टाकीचा झालेला भीषण स्फोट आणि त्यानंतर लागलेली आग पाहून परिसरातील नागरिकही पुरते हादरले होते. सुदैवाने घटनेच्या वेळी ऑटोमध्ये केवळ चालक एकटाच होता. धडक होताच आग लागल्याचे पाहून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने सेकंदाचाही उशीर न करता ऑटोमधून बाहेर उडी घेतली. काही सेकंदांचा जरी उशीर झाला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र, चालकाच्या या धाडसामुळे त्याचा मृत्यूच्या दाढेतून चमत्कारिकरित्या बचाव झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news