

शिरूर अनंतपाळ : येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव श्रीमंतराव पाटील (५८) यांचे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील शेंद उत्तर येथील रहिवासी असलेले विठ्ठलराव पाटील हे शुक्रवारी सायंकाळी स्वतःच्या मोटारसायकलवरून आरीमोडकडून शिरूर अनंतपाळकडे येत होते. आरीमोड ओलांडून खाली येत असताना प्रशासकीय इमारतीच्या पुढे नवीन पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांची मोटारसायकल घसरून अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांच्या नाकातून व तोंडातून रक्तस्राव होत असल्याचे उपस्थित नागरिकांच्या निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनंत पुरी यांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या मूळ गावी शेंद उत्तर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विठ्ठलराव पाटील यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक भाऊ, तीन बहिणी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली व दुर्दैवी निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण शिरूर अनंतपाळ तालुक्यात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.