Latur Accident | ॲडमिट पेशंटला पाहण्यासाठी गेलेल्या बहीण - भावाचा अपघातात जागीच मृत्‍यू!

ट्रक - दुचाकीचा भीषण अपघात, रेणापूर - उदगीर महामार्गावर
Latur Accident | ॲडमिट पेशंटला पाहण्यासाठी गेलेल्या बहीण - भावाचा अपघातात जागीच मृत्‍यू!
Published on
Updated on

रेणापूर :   रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका नातेवाईक महिलेला पाहण्यासाठी येत असलेल्या बहीण-भावाचा ट्रक - दुचाकीच्या अपघातात जागीच मृत्यू झाला. परळी - पिंपळफाटा - रेणापूर - उदगीर महामार्गावर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका ट्रक चालकाने दुचाकिला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा भिषण अपघात घडला.

ही घटना रविवारी ( दि.३०) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रेणापूरच्या ग्रामीण रुग्णालयासमोर घडली. प्रतीक सतीश क्षीरसागर व त्‍याची बहीण बहीण कल्याणी राघू घोबाळे यांचा जागीच मृत्‍यू झाला. या अपघातात इतर दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांच्यावर लातूर येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघात इतका भयानक होता की सदर मयताचे शव ट्रक चालकाने शंभर फुटापर्यंत फरफटत नेले होते. यातील मयत कल्याणी हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झालेला आहे. ती सध्या मुंबई येथे वास्तव्यास होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे धर्मापुरी येथील रहिवासी असलेले सतीश प्रभाकर क्षीरसागर हे सध्या लातूर येथील कव्हा नाका परिसरात कुटुंबासह राहून मजुरी करतात. सतीश क्षीरसागर यांची मेहुणी नंदिनी विलास भोसले (रा. शेलू-जवळगा) या आजारी असल्याने रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यांना पाहण्यासाठी प्रतीक सतीश क्षीरसागर (वय २४), त्याची आई माया सतीश क्षीरसागर (वय ४०), बहीण कल्याणी राघू घोबाळे (वय २०) आणि पुतण्या साई प्रशांत क्षीरसागर (वय ६) हे चौघे दुचाकीवरून (क्रमांक: MH-24-BB-1962) रेणापूरकडे निघाले होते.

दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकी रेणापूर ग्रामीण रुग्णालयाकडे वळत असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या लोडिंग ट्रकने (क्रमांक: KA-39-8160) दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात प्रतीक क्षीरसागर आणि त्याची बहीण कल्याणी घोबाळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर आई माया क्षीरसागर आणि पुतण्या साई क्षीरसागर हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच रेणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि रवींद्र शिंदे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news