

जळकोट : पावसाळ्यात सुनामीसारख्या आलेल्या अतिवृष्टी व ढगफुटीने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. आता हंगामात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावून 14 जानेवारी रोजी सायंकाळी जळकोट तालुक्यात धुमाकूळ घातला. धो धो पावसामुळे जबरदस्त बसलेल्या फटक्याने गावरान व केशर आंब्यासह फळबागा, भाजीपाला व रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
हवामान बदलाची परिस्थिची जळकोट तालुक्यातील केशर आंबा उत्पादक शेतक-यांच्या मूळावर उठली आहे.14 रोजी सायंकाळी अचानक धो धो स्वरुपात कोसळलेल्या अवकाळी पावसाने जळकोट शिवारातील केशर आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या पावसामुळे सुवर्णा गिरीराम डुमणे या महिला शेतक-याच्या जळकोट येथील गट नंबर 1095 मधील 1 हेक्टर 76 आर केशर आंब्याच्या बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. केशर आंब्याला मोठ्या प्रमाणात तोर आला असून फळधारणा सुरु होऊन झाडे आंबा फळाने बहरली होती. तथापि, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने फळ गळती होऊन सुवर्णा डुमणे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सुवर्णा डुमणे यांनी केली आहे. याबरोबरच जळकोट शहरास तालुक्यातील अनेक गावांतील अनेक शेतकऱ्यांचे केशर आंबा, गावरान आंबा, चिंच या फळांचे नुकसान झाले आहे. तसेच गहू, भाजीपाला, तूर, ज्वारी यांचे नुकसान झाले असून या सर्व नुकसानीची पाहणी करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुक्यातील आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.