

संग्राम वाघमारे
चाकूर : महिलांनी सर्वच क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली असून चाकूर तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये महिला अधिकारी सक्षमपणे प्रशासकीय कारभार सांभाळताना दिसत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी पाहिलेले स्त्री-सक्षमीकरणाचे स्वप्न चाकूरमध्ये प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र दिसत असून तालुक्यात खऱ्या अर्थाने “महिलाराज” असल्याची भावना व्यक्त होत आहे.
उपविभागीय अधिकारी म्हणून डॉ. मंजुषा लटपटे या महसूल विभागातील विविध कामांचा समन्वय साधत अहमदपूर विभागाचा कारभार समर्थपणे सांभाळत आहेत. सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी शुभांगी चाटे यांनी वृक्षलागवड व मनरेगा योजनांद्वारे शेतकऱ्यांना विविध योजना मिळवून देण्याचे काम केले आहे.
वनविभागात वर्षा नागरगोजे या अहमदपूर परीक्षेत्राच्या वनपरीक्षेत्र अधिकारी म्हणून अहमदपूर, उदगीर, जळकोट व चाकूर तालुक्याचा कारभार पाहत असून वृक्षलागवड, वन्यजीव संरक्षण व पाणवठे उभारणीसारखी महत्त्वाची कामे त्यांनी राबविली आहेत.
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विद्या लोमटे या अंगणवाडी सेवा, कुपोषित बालकांचे प्रश्न व महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवत आहेत. शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे या शाळांचे निरीक्षण, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे व विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्याचे काम करत आहेत.
भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक वैशाली गवई जमीन मोजणी, डिजिटल नकाशे व भू-अभिलेख संगणकीकरणाची कामे सांभाळत आहेत. तर पुरवठा निरीक्षण अधिकारी अफसाना मुल्ला या सामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
याशिवाय चाकूर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल ज्योती पुणे या विद्यार्थिनींच्या शिक्षण, संस्कार व सुरक्षिततेची जबाबदारी दक्षतेने पार पाडत आहेत.
तालुक्यातील विविध कार्यालयांमध्ये महिला अधिकारी आपल्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडत असल्याने स्त्री आजही पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असल्याचे चित्र चाकूरमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त या कर्तृत्ववान अधिकाऱ्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरत आहे.
लातूर जिल्ह्याच्या प्रमुखच एक महिला सक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्या म्हणजे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे. जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारी महिला अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.त्यांचे प्रशासनातील काम उल्लेखनीय मानले जाते.