

Installation of idols of Ganesh, Mahalaxmi, Hanuman temples at MIT Latur
लातूर, पुढारी वृतसेवा : लातूर, दि. १७: येथील एमआयटी शिक्षण संकुलातील विश्वमैदान परिसरात नव्याने साकारण्यात आलेल्या श्री गणेश, श्री महालक्ष्मी आणि श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय, एक लाख स्क्वेअर फूटातील 'विश्वमैदान' क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा होईल.
माईर एमआयटी शिक्षण संस्था समुहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, माईर एमआयटीचे विश्वस्त तुळशीराम कराड, प्रगतशील शेतकरी काशिराम कराड यांच्या प्रेरणा आणि आशीर्वादाने होत असलेल्या या सोहळ्यासाठी ह.भ.प. अर्जुन महाराज लाड, ह.भ.प. विद्यानंद महाराज गातेगाव, ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्री, ह.भ.प. विठ्ठल महाराज फड, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. मधुकर कुलकर्णी, डॉ. माया कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी विणा-पूजन, मिरवणूक, श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, देवता स्थापना आणि अन्य धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी रोजी प्रासाद वास्तु, कुटीर होम, मुख्य देवता हवन, स्नपनविधी आदी धार्मिक विधी होणार आहेत. सायंकाळी ४.३० ते ६ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होईल. त्यानंतर ६ ते ८ या वेळेत ह.भ.प. वामन महाराज जाधव यांचे किर्तन होईल..
२२ फेब्रुवारी रोजी प्रातः पूजन, मूर्ती स्थापना, कळसारोहण, उत्तरांग हवन व बलिदान विधी संपन्न होतील. सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. नारायण महाराज उत्-रेिश्वर पिंप्री यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते ११.३० या वेळेत महापूर्णाहुती, महानैवेद्य दुपारी १२ वाजता, महाआरती १२.३० ते १ आणि महाप्रसाद १ ते ३ या वेळेत होणार आहे.
यज्ञप्रमुख आचार्य म्हणून वे. शा. संपन्न श्री रामकृष्ण कुलकर्णी गुरुजी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या सोहळ्यासाठी अनेक कीर्तनकार, भजनकार, टाळकरी व कलाकार यांची उपस्थिती लाभणार आहे. सोहळ्याला सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन माईर एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड आणि आ. रमेशअप्पा कराड यांनी केले आहे.