

बालाजी फड
लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीला भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युती करून सामोरे जाणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांच्या जागा वाटपाबाबत बैठकांवर बैठका होत आहेत. गतवेळी २०१७मध्ये "झिरो टू हिरो ठरलेली भाजपा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला २२ जागा देण्यास तयार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
त्यामुळे भाजप राष्ट्रवादी युतीचा ४८-२२ असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे राजकीय वर्तुळातून समजते. मात्र याबाबत दोन्ही राजकीय पक्षांकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही. बहुतेक युती व जागा वाटपाचे शक्यता वर्तवली जात आहे.
लातूर शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी हा पक्ष २०१७ च्या निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली ३६ जागा जिंकून सत्तेत आला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस केवळ एका जागेवर जिंकली होती. ती एक जागा जिंकणारे नगरसेवक राजासाब मणियार आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. परंतु, आता महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून इनकमिंग सुरू झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत आहे.
काँग्रेसमधील अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपसह काँग्रेसला टक्कर देऊ शकतो, असे समीकरण तयार झाले आहे. पक्ष पातळीवरून महापालिका निवडणूक युती करण्यास परवानगी दिल्याने राज्याचे सहकार मंत्री व राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे व समोरून भाजपाचे नेते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार रमेश आप्पा कराड, आमदार अभिमन्यू पवार, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर या नेत्यांच्या संयुक्त बैठका होऊन लातूर महापालिकेत युती करण्यावाचत सकारात्मक चर्चा करण्यात आली. या चर्चेसोबतच महापालिकेच्या ७० जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने २२ जागा व भाजपाने ४८ जागा लढाव्यात असे ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र या वृत्ताला दोन्ही मित्र पक्षांकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. बहुतेक जागावाटप व युतीची घोषणा एकाच वेळी होईल, अशी चर्चा राजकीय गोटात आहे.
गाव भागातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला?
लातूर महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजप ३६ तर काँग्रेसने ३३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकली होती. भाजपच्या ३६ जागा पश्चिम लातूर भागातल्या होत्या, तर मुस्लिम व मागासवर्गीय बहल गाव भाग परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. गाव भागात प्रभाग २, ३, ४, ५ व ७ मध्ये मागच्या वेळी भाजप कमी असल्याने यावेळी या जागा राष्ट्रबादीला सुटणार असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेला सोबत घेण्याची शक्यता कमीच
लातूरमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. त्यांच्या तुलनेत शिवसेना पक्षाची ताकद नाही. कालच शिवसेनेचे सहसपर्कप्रमुख अॅड. बळवंतराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेना आणखी कमजोर झाली आहे. भाजपाचे मनपा निवडणूक प्रमुख आ. संभाजीराव पाटील निलंगेकर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन दाणे यांच्यात युती संदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र शिवसेना ज्या जागा मागणार आहे तेथे निवडून येण्याची गुणवत्ता दाखवावी लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेला जागा किती मिळतील अथवा त्यांना सोबत घेतले जाईल की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात संशय व्यक्त होत आहे.
युतीमुळे भाजपातील निष्ठावंत नाराज; स्वबळाचा सूर
राष्ट्रवादी काँग्रेससोबत होऊ घातलेल्या युतीमुळे भाजपातील निष्ठावंत कार्यकत्यांमध्ये नाराजी दिसत आहे. युती झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसला गाव भागातील मुस्लिम व मागासवर्गीय बहुल भागातील प्रभाग सोडले जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर या भागातील भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागणार आहे. मागच्या निवडणुकीत भाजपला गाव भागातील प्रभाग २, ३, ४, ५ व ७ मध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रभाग ३ मधून भाजपचे एकमेव मंगेश बिरादार जिंकले होते. तर या प्रभागांमधील एकूण १९ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. भाजपच्या १९ जागा अवघ्या २०० ते ३०० मर्ताच्या फरकाने पडल्या होत्या. त्यामुळे या भागातून आजही इच्छुक असलेले उमेदवार आपण जिंकू शकतो. युती न झाल्यास भाजप गाव भागातून किमान १०-१२ जागा जिंकेल व महापालिकेत भाजप ५० पार करेल, असा विश्वास भाजप कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. मात्र युती झाल्यास सतेची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातील, असा अंदाजही बांधत आहेत, त्यामुळे भाजपने स्वबळावर लढावे, असा सूर भाजपा कार्यकर्ते काढत आहेत.