

समाधान डोके
ईट : सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात आली असली तरी महावितरणच्या अवेळी वीजपुरवठ्यामुळे ईट व परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. खरीप हंगाम परतीच्या पावसाने पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याने रब्बी हंगामातून तरी काहीतरी पदरात पडेल, या आशेने शेतकरी पिके जगवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र शेतीसाठी वीजपुरवठा रात्रीच्या वेळी होत असल्याने शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत अख्खी रात्र शेतात काढावी लागत आहे.
ईट परिसरातील बहुतांश गावांमध्ये रात्री 8 वाजता तर काही ठिकाणी रात्री 12 वाजता शेतीसाठी वीजपुरवठा केला जातो. काही गावांमध्ये दिवसाआड तर काही ठिकाणी 6, 8 किंवा 12 तास खंडित वीजपुरवठा होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हरभरा, ज्वारी, कांदा, गहू, राजमा यांसारख्या पिकांना रात्रीच्या अंधारात बॅटरी किंवा टॉर्चच्या प्रकाशात पाणी द्यावे लागत आहे. दिवसभर शेतात मेहनत केल्यानंतर रात्री थंडीत पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे.
महावितरणने रात्रीऐवजी सकाळी किंवा दुपारी शेतीसाठी वीजपुरवठा करावा, अशी मागणी ईट परिसरातील शेतकऱ्यांकडून जोर धरत असून, ती मान्य झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सरपटणाऱ्या जिवांची भीती!
रात्री शेतात थांबताना वन्यप्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांची भीतीही सतावत आहे. आठ तास वीज दिली जाते, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पुरवठा सतत खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रभर शेतातच थांबावे लागत आहे. रब्बी पिकांसाठी केलेला खते, बियाणे, औषध फवारणीवरील खर्च, घेतलेले कर्ज तसेच मुलांचे शिक्षण व लग्नाचा खर्च डोळ्यांसमोर असल्याने बळीराजा संकटातही पीक वाचवण्यासाठी धडपडताना दिसून येत आहे.