

During the Ganesh festival, DJ and Dolby sound systems were used; cases have been filed against 20 people in court
लातूर, पुढारी वृत्तसेवा : शहरात २७ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत गणेशोत्सवाच्या मिरवणुकांदरम्यान मोठ्या क्षमतेच्या ध्वनी प्रक्षेपण यंत्रणा (डीजे, डॉल्बी) बापरण्यास सक्त मनाई असताना व त्या अटीखालीच परवाना दिला असताना १० गणेश मंडळांनी डीजे, डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण केल्याचे आढळून आले. या प्रकरणी संबंधित १० गणेश मंडळांचे अध्यक्ष तसेच त्या मंडळांकडून वापरण्यात आलेल्या १० डीजे, डॉल्बी मालकांविरुद्ध दि. २७ जानेवारी रोजी येथील न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.
लातूर शहरात २०२५ मधील गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साजरा करण्यात आला. तथापि, काही गणेश मंडळांकडून डीजे, डॉल्बीचा वापर करून ध्वनी प्रदूषण केल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. ध्वनी प्रक्षणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, गणेश-ोत्सव सुरू होण्यापूर्वीच गणेश मंडळांना परवानगी देताना स्पष्ट अटी व बंधने घालण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम २००० चा भंग होणार नाही, तसेच मोठ्या क्षमतेच्या ध्वनी प्रक्षेपण यंत्रणा (डीजे, डॉल्बी) वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. या अटींची लेखी नोटीस देवून मंडळांना परवानगी देण्यात आली होती.
यासोबतच गणेशोत्सव काळात ध्वनी प्रक्षण टाळण्यासाठी वर्तमानपत्रांद्वारे, तसेच वेळोवेळी गणेश मंडळांच्या बैठका घेऊन पोलीस प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास अनेक मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, असे असतानाही गणेशस्थापना मिरवणुकांदरम्यान लातूर शहरातील १० गणेश मंडळांनी डीजे, डॉल्बी लावून ध्वनी प्रक्षण केल्याचे आढळून आले.
या प्रकरणी संबंधित १० गणेश मंडळांचे अध्यक्ष तसेच त्या मंडळांकडून वापरण्यात आलेल्या १० डीजे, डॉल्बी मालकांविरुद्ध पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ चे कलम १५ व १९ तसेच ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० अन्वये खटले दाखल करण्यात आले आहेत. सदर अपराधासाठी ५ वर्षांपर्यंत कारावास अथवा एक लाख रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होण्याची तरतूद आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या नेतृत्व-ाखाली पोनि. सुनिल रेजीतवाड (पो.स्टे. गांधी चौक), पोनि. अभिषेक शिंदे, पोनि. समाधान चवरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोउपनि. राजाभाऊ सूर्यवंशी, पोलीस अंमलदार पांडुरंग सगरे व अरविंद वाघमोडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.