

Dr. Anna Bhau Sathe Chowk in Chakur should not be relocated
चाकूर, पुढारी वृत्तसेवा : चाकूर शहरात होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या सुशोभीकरण चौकाचे स्थलांतर करण्याची शक्यता निर्माण झाली असून तो मूळ ठिकाणीच सुरक्षित ठेवावा, अशी मागणी समस्त मातंग समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गुरुवारी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गाचे काम डॉ. अण्णा भाऊ साठे चौक परिसरापर्यंत आले आहे, या ठिकाणी गेल्या ५० वर्षांपासून चौक आहे. येथील अर्धाकृती पुतळा समाजासाठी प्रेरणा देणारा आहे. हा पुतळा मातंग समाजाच्या श्रद्धा, अस्मिता आणि सामाजिक भावनांशी निगडित असल्याने त्याचे स्थलांतर केल्यास समाजात तीव्र नाराजी निर्माण होऊ शकते.
म्हणून संबंधित विभागाने महामार्गाचे नियोजन करताना डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच पुतळा मूळ ठिकाणीच सुरक्षित ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून समस्त मातंग समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर नितीन डांगे, देवानंद कोटंबे, परमेश्वर गायकवाड, अमोल मोठेराव, मुद्रिका औसेकर, ओमकार मोठेराव, जयश्री मोठेराव, सविता सिरसाठ, पूजा औसेकर, प्रिन्स वैरागे, मंडोदारी मोठेराव, राम डांगे, पुंडलिक मोठेराव, महादेव मोठेराव, अतिश मोठेराव, रवी कांबळे, संग्राम मोठेराव, साईनाथ गायके, चंदर कांबळे, गोविंद घोडके, बालाजी लोंढे यांच्यासह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.