

चाकूर : नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार यांनी नगराध्यक्ष कपील माकणे यांच्याकडे शुक्रवारी (दि.२८) आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला. नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याचे कारण पुढे करत पंधरा नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याअगोदरच त्यांनी नगराध्यक्ष कपील माकणे यांच्याकडे राजीनामा दिला.
उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार हे नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत, त्यांना वेळ देत नाहीत हे कारण दाखवित पंधरा नगरसेवकांनी २६ मार्च रोजी मुख्याधिकारी प्रतीक लंबे यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याअगोदरच बिरादार यांनी नगराध्यक्ष कपील माकणे यांच्याकडे राजीनामा सादर केला. यावेळी नगरसेवक नितीन रेड्डी, साईप्रसाद हिप्पाळे, महमद सय्यद, बाळू लाटे उपस्थित होते.
दरम्यान अरविंद बिरादार यांनी मी माझ्या वैयक्तीक अडचणीमुळे राजीनामा दिला असून वैद्यकीय अडचणीमुळे बाहेरगावी गेलो होतो. शुक्रवारी वरिष्ठांच्या आदेशाने ठरल्याप्रमाणे माझा राजीनामा अध्यक्षांकडे सुपुर्द केला असल्याचे सांगितले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरविंद बिरादार यांनी राजीनामा दिल्याने या पदासाठी आता कोणाची वर्णी लागेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.