

परळी : विदर्भातील ११ आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड व मदर डेअरीच्या सहकार्यातून दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दूध संकलन, चारा लागवड, दुधाळ जनावरांची संख्या वाढवणे आणि आर्थिक पाठबळ मिळणे यावर भर दिला जाणार आहे.
नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यात झालेल्या बैठकीत या प्रकल्पाच्या तांत्रिक, आर्थिक व व्यवस्थापकीय बाबींचा सविस्तर आढावा घेतला गेला. बैठकीत विदर्भ-मराठवाडा दुग्ध प्रकल्पाचे संचालक, एनडीडीबीचे चेअरमन आणि राज्याचे पशुसंवर्धन सचिव उपस्थित होते.
दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील ११ आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांचा समावेश असून, शेतकऱ्यांना उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई, म्हशींचे वाटप, पशु प्रजनन पूरक खाद्य, दुधातील फॅट व एसएनएफ वर्धक खाद्य, तसेच बहुवार्षिक चारा पिके, विद्युत चलित कडबाकुट्टी यंत्र, मुरघास वाटप केले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने दूध व्यवसाय करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल, जेणेकरून स्थानिक स्वयंरोजगाराला चालना मिळेल. बीड जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर आणि इतर विकास कामांसंदर्भात मंत्री मुंडे यांनी केंद्रीयमंत्री गडकरी यांना मागण्यांचे पत्र सादर केले. या पत्राला केंद्रीय मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
दूध व्यवसायाला चालना देणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळवून देणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी हा प्रकल्प मोठा टप्पा ठरणार आहे. आमच्या प्रयत्नांनी प्रत्येक शेतकरी सक्षम व आत्मनिर्भर बनेल," असे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. दुग्धविकास प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीत सांगितले.