

चाकूर : चाकूरहून उदगीरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा हणमंतवाडीच्या पुढील उतार रस्त्यावर पाट्याचा खोबळा तुटल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडल्याने मोठा अपघात टळला असून या घटनेमुळे बसमधील सुमारे १२० प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान बसमधील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ प्रवास्यांना काही काळ भर उन्हात ताटकळत थांबावे लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) बसेसची अवस्था दिवसेंदिवस खालावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रवासादरम्यान बसेस वारंवार बंद पडत असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चाकूर ते उदगीर मार्गावर सोमवारी हणमंतवाडीच्या पुढील उतारावर उदगीर डेपोची बस क्रमांक एम एच २० बी एल २२१९ ही गाडी दररोज चाकूर बसस्थानक येथून दुपारी अडीच वाजता निघणारी बस शेळगांव, डोंगरज मार्ग उदगीरकडे १ तास उशिराने साडेतीन वाजता ५५ प्रवाशांची मर्यादा असताना १२० प्रवाशांना घेऊन निघाली. ती हणमंतवाडीच्या पुढील घाटात गेल्यानंतर त्या एसटीचा पाट्यावरील खोबळा तुटल्याने बस रस्त्याच्या डाव्या बाजूने खाली झुकली आणि अपघाताचा मोठा धोका टळल्याने प्रवाश्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर बसमध्ये विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक प्रवास करत होते. आधीच बस खचाखच भरलेली असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना भर उन्हात रस्त्यावर थांबण्याची वेळ आली. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून त्यांनी एसटी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. उदगीर–चाकूर मार्गावर हणमंतवाडी, बोथी, शिरणाळ पाटी, कलकोटी, राच्चनावाडी, शेळगाव आणि डोंगरजकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही पुरेशा बसेस उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. परिणामी एका बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेनंतर काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडीमुळे त्या भागातील प्रवाशांना त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. काही प्रवाशांना दुसरी गाडी येईपर्यंत एसटी बस गाडीचीच काही काळ वाट पाहावी लागली. या घटनेमुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
वरिष्ठानी उदगीर–चाकूर मार्गावर अतिरिक्त बसेस सुरू करून प्रवाशांना सुरक्षित व नियमित सेवा उपलब्ध करून द्यावी, तसेच बसची तांत्रिक तपासणी नियमित करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
मी दररोज या गाडीने चाकूर ते डोंगरज प्रवास करतो. आज दुपारच्या गाडीने गावी जात असताना या गाडीचा अचानक पाटा तुटल्याने गाडीतील प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. मोठा अपघात टळला आहे. एस टी बसचे हे नेहमीचेच झाले आहे. कधी तांत्रिक बिघाड तर कधी गाडी रद्द यामुळे आम्हाला नाहक त्रास होत आहे. या मार्गांवर अधिक व नवीन बसगाड्या सोडाव्यात.
वेदांत मुंढे, विद्यार्थी प्रवासी